बचत गटांनी स्पर्धा करून उत्कृष्ट उद्योजक बनावे
By admin | Published: August 27, 2016 12:22 AM2016-08-27T00:22:04+5:302016-08-27T00:22:04+5:30
बचत गटांनी बाजारपेठेतील उत्पादकाशी स्पर्धा करून लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्कृष्ट उद्योजक बनावे.
शैलेश नवाल : वस्त्रोद्योग व शिवणकाम कार्यशाळा
वर्धा : बचत गटांनी बाजारपेठेतील उत्पादकाशी स्पर्धा करून लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्कृष्ट उद्योजक बनावे. यासाठी त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला शासनाच्यावतीने बाजार पेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच उद्योगाकरिता निधी सुद्धा उपलब्ध करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी विकास भवन येथे आयोजित वस्त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेत केले.
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद, माविम व कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प यांच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या वस्त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेच्या कार्यक्रमाला कृषी समृद्धी कृषी विकास प्रकल्प (केम) चे प्रकल्प संचालक गणेश चौधरी, जिल्हा परिषदचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आजनकर, नाबार्डच्या व्यवस्थापक बन्सोड, रितेश ताजने, माविमच्या जिल्हा व्यवस्थापक दारोडकर, देवकुमार कांबळे, कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निलेश वावरे, प्रवीण जयस्वाल व मिलिंद भगत यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी शैलेश नवाल म्हणाले, बचत गटांनी आपला कायमस्वरूपी उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेती, दाल मिल, घरगुती कापड उद्योग यासारखे उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती करून कुशल उद्योग सुरू करावे. यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपला उद्योग सुरू करावा व बाजारपेठेत आपल्या बचत गटाची ओळख निर्माण करावी. बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला शहरातील मध्यभागी दुकाणे सुरू करून कमीशनवर विकण्यास प्रयत्न करण्यात येईल. गटांनी शेतीवर आधारित आधुनिक उपकरणे खरेदी करून शेकऱ्यांना भाडे तत्वावर द्यावी. या उपकरणामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यास मदत होईल. बचत गटांना आर्थिक लाभ होऊन बचत गट सक्षम होण्यास मदत होईल. तसेच बाजारपेठेतील उत्पादनांशी स्पर्धा करून या स्पर्धेत उतरायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रमोद पवार म्हणाले, बचत गटांनी बाजारपेठमध्ये ज्या वस्तूची जास्त मागणी असले त्याच वस्तूचे उत्पादन करावे. जेणेकरून गटाच्या उत्पादित मालाला भाव मिळून गटाचे आर्थिक उत्पन्न वाढेल पर्यायाने गट सक्षम होईल, तसेच कंपनीच्या मालाशी स्पर्धा करून कमी दरात मालाची विक्री केल्यास जास्त प्रमाणात बाजारपेठ मिळण्यास मदत होईल.
यावेळी कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प(केम)च्या वतीने प्रकाशित यशोगाथा या पुस्तिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी केमचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी व इतर मान्यवरांनी बचत गटाच्या महिलांना उद्योग सुरू करण्याविषयी मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)