गणेश विसर्जन पर्यावरणपूरक करा
By admin | Published: September 3, 2016 12:11 AM2016-09-03T00:11:44+5:302016-09-03T00:11:44+5:30
उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य पाणी प्रदूषण मंडळाला वापराचे पाणी प्रदुषित होणार नाही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहे.
पुरोगामी संघटनेची मागणी : प्रशासनाकडून चोख अंमलबजावणी करा
वर्धा : उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य पाणी प्रदूषण मंडळाला वापराचे पाणी प्रदुषित होणार नाही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहे. कार्यवाहीचा केंद्रीय पाणी प्रदुषण मंडळ, उच्च न्यायालय व राज्य शासनाने पाणी प्रदूषित होवू नये म्हणून काढलेला आदेश, यासर्व आदेशांची जिल्हा प्रशासनाने त्वरीत अंमलबजावणी करुन पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी उपायोजना करण्याची मागणी पुरोगामी संघटनांनी केली.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. पाणी प्रदूषण टाळण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा वर्धाच्यावतीने जनजागृती अभियान राबविण्यात येते. या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी नगर परिषद, संचालक महाराष्ट्र पाणी प्रदुषण मंडळ वर्धा विभाग यांना देण्यात आल्या.
गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पिण्याचे अथवा वापराचे पाणी प्रदूषित होवू नये म्हणून कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनेच्यावतीने गत २० वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी अभियान राबविण्यात येते. पर्यावरण खात्याने याबाबत तपशिलवार आदेश दिले आहेत. मात्र मागील वर्षी शासनाने याची अंमलबजावणी केली नाही. शासनाच्या आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी. शांतता समितप्रमाणे पर्यावरणावरविषयक कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांची प्रशासनाच्या मार्गदशनाखाली पर्यावरणपूरक गणेश उत्सव समिती गठित करुन त्यानुसार कार्यवाही करावी. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रशासनाने विसर्जनाच्या स्थळी पर्यायी हौद उपलब्ध करुन द्यावे. होमगार्ड स्वयंसेवक नियुक्त करावे. मुर्तीचे निर्माल्य व पूजा साहित्य वाहत्या पाण्यात टाकणार नाही याची दक्षता घेऊन न्यायालयाचा अवमान केल्यास त्याबद्दल समज द्यावी अशी मागणी केली. यावेळी गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले, नरेंद्र कांबळे, प्रकाश कांबळे, सुनील ढाले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)