वाचनालयांना शैक्षणिक चळवळीची ज्ञानमंदिरे बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:40 AM2018-01-24T00:40:08+5:302018-01-24T00:40:32+5:30
आजच्या माहिती तंत्रज्ञानातील गुणवत्तेच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडत आहे. तर शासनाने शिक्षणक्षेत्र खाजगी उद्योगपतींकडे सोपविण्याच्या निर्णय घेतल्याने भावीपिढी समोर शैक्षणिक आव्हान निर्माण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आजच्या माहिती तंत्रज्ञानातील गुणवत्तेच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडत आहे. तर शासनाने शिक्षणक्षेत्र खाजगी उद्योगपतींकडे सोपविण्याच्या निर्णय घेतल्याने भावीपिढी समोर शैक्षणिक आव्हान निर्माण झाले. अश्या परिस्थितीत सार्वजनिक वाचनालयांना शैक्षणिक चळवळीचे आधुनिक ज्ञानमंदिर बनविण्याचे आवाहन पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अनुसूचित जाती कल्याण समिती सदस्य आमदार प्रा. जोंगेंद्र कवाडे यांनी केले.
संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, भिडी व सार्वजनिक ग्राम वाचनालय, शिरपूर (होरे) यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामीण भागातील वाचनालयात स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन प्रा. कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यक्तीमत्व विकासाच्या पाया असलेल्या ग्रामीण भागातील वाचनालयांना इंटरनेटशी जोडून सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील यशासाठी आवश्यक पुस्तके व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रा. कवाडे यांनी सूचविले.
महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम २०१७-१८ अंतर्गत वाचनालयांना प्राप्त झालेल्या निधीतून भिडी येथे, दिवंगत निळकंठ हेंडवे यांच्या निवासस्थानी तर शिरपूर (होरे) येथील हनुमान मंदिरात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, ग्रंथपाल अस्मिता मंडपे, भिडी वाचनालयाचे अध्यक्ष अरूण हर्षबोधी, शिरपूर वाचनालयाचे अध्यक्ष मारोती इंगोले, मनोहर लांडगे, पंचायत समिती सदस्य शंकर उईके, माजी पंचायत समिती सदस्य ज्योती काळे, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे प्रा. श्रीराम मेंढे, अरविंद माणिककुळे, सत्येंद्र गोटे, देवळी नगरपरिषद सदस्य पोपटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह वासुदेव दिघाडे, डॉ. प्रकाश काळे, विलास भगत, किरण थुल, बी.यु. डोंगरे, चिंतामन डांगे, अविनाश भितकर, किरण होरे, गजानन राजुरकर, विलास फुलमाळी, हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होरे प्रामुख्याने उपस्थित होते. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या सहकार्याने भिडी येथील गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालया जागा उपलब्ध करुण देणाºया चारूलता व राजकुमार डोंगरे दाम्पत्याच्या सन्मान प्रा. कवाडे यांच्या हस्ते यावेळी केला. स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत पुणेरी पॅटर्नवरील पुस्तके व प्रश्नसंच उपलब्ध करुन दिल्याची माहिती अरूण हर्षबोधी यांनी प्रास्ताविकातून दिली. यानंतर शिरपूर (होरे) येथील बुद्ध विहाराला प्रा. कवाडे यांनी भेट दिली. संचालन प्रकाश हेंडवे यांनी केले तर आभार ग्रंथपाल देवेंद्र वाघमारे व सचिन इंगोले यांनी मानले. श्रावस्ती महिला मंडळाने सहकार्य केले.
समस्यांचा आढावा
यावेळी झालेल्या विशेष चर्चेत सार्वजनिक वाचलनालयांना मिळणारे अत्यल्प अनुदान व वाचनालयात कार्यरत कर्मचाºयांचे मानधन याबाबतचा प्रश्न आगामी अधिवेशनात मांडणार असल्याचे आश्वासन प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी वाचनालय प्रतिनिधींनी दिले. तसेच वाचनालयाच्या संबंधीत समस्यांचा आढावा त्यांनी घेतला.