नवीन समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:45 PM2018-03-15T23:45:27+5:302018-03-15T23:45:27+5:30
आधुनिक युगात माध्यमांचा वापर चांगला किंवा वाईट प्रकारे करणे हे पूर्णत: व्यक्तीवर अवलंबून असते. समाज माध्यम हे आजच्या आधुनिक युगात संपर्काचे अतिशय प्रभावी साधन ठरत आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : आधुनिक युगात माध्यमांचा वापर चांगला किंवा वाईट प्रकारे करणे हे पूर्णत: व्यक्तीवर अवलंबून असते. समाज माध्यम हे आजच्या आधुनिक युगात संपर्काचे अतिशय प्रभावी साधन ठरत आहे. आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात याचा वापर करीत आहे. या माध्यमांचा सकारात्मक आणि विधायक वापर करण्यासाठी जागृत करण्याची गरज आहे. यातून विवेकी समाज घडविण्यास मदत होईल, असे मत अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वतीने राज्यभर सोशल मिडिया महामित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सोशल मिडिया संवाद सत्राचे आयोजन न्यू आर्टस व कॉमर्स महाविद्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मंचावर उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रणिता कश्यप, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना स्मिता पाटील यांनी माहिती व जनसंपर्क विभागाने राबविलेला सोशल मिडिया महामित्र हा उपक्रम शासनाची ध्येय धोरणे आणि योजना तळगाळातील गरजु व वंचित नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अतिशय विधायक ठरेल असे मत व्यक्त केले. राज्यस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडल्या जाणाऱ्या तरुणांनी जिल्ह्याचे उत्तम प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या संवाद सत्रात सहभागी झालेल्या युवकांना सायबर सुरक्षितता या विषयावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलचे कुलदिप टांकसाळे व अक्षय राऊत यांनी पीपीटी द्वारे सादरीकरण करून मार्गदर्शन केले. सोशल मिडिया संवाद सत्रात सहभागी झालेल्या सर्व युवकांना आणि परिक्षकांना यावेळी मान्यवरांचे हस्ते माहिती व जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेले महाराष्टÑ वार्षिकी हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. या संवाद सत्रातून जिल्ह्यातील चार युवकांची निवड होऊन त्यांना राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राज्यस्तरीय चर्चासत्रात विजेत्यांना थेट मुख्यमंत्र्याशी संवाद साधता येणार आहे.
यावेळी प्रा. अश्विनी भेंडे, गोरक्ष महात्मे, दिपाली काळे, अबोली मिथे, स्वाती लांबट, पायल सोरते, नंदिनी किटे व मयुरी मानकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले तर लोकेश गांडोळे, शेख मोहेद, प्रसाद पाटील, अतुल कातरकर, प्रविण पोहाणे, अश्विन सव्वालाखे, हेंमत ब्राम्हणकर, प्रशांत सिसोदे हे निरीक्षक होते. या उपक्रमाला प्राचार्य प्रशांत कडवे, डॉ. प्रशांत टाकधट यांनी सहकार्य केले. जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रफुल खंडारे, दिलीप बोंडसे, संजय धमाने, संजय चिट्टवार, राजेश बावने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी केले. जिल्ह्यातील युवक सहभागी होते.
व्यक्तीनुरूप समाज माध्यमांचे यश
कोणताही शोध लागल्या नंतर त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम दिसून येतात. सोशल मिडियाचा शोध सुध्दा याच प्रकारात गणल्या जाईल. पण त्याचा वापर कोण आणि कशा पध्दतीने करतो. यावर समाज माध्यमाचे यशापयश अवलंबून आहे.
मणुष्य प्राणी हा सुसंस्कृत आणि बुध्दीमान असून इतर पृथ्वीवर असलेल्या अन्य प्राण्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे समाज माध्यमाचा वापर करताना सुध्दा सद्सदविवेक बुध्दीचा वापर केला पाहिजे. ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. या माध्यमाचा सकारात्मक पध्दतीने आणि काळजीपूर्वष उपयोग करावा असे आवाहन संजय दैने यांनी युवकांसोबत संवाद साधताना केले.