कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबाबत पुरुष उदासीनच
By admin | Published: July 11, 2017 12:58 AM2017-07-11T00:58:03+5:302017-07-11T00:58:03+5:30
सर्वच कामांत महिला या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात पुरूष माघारले असल्याचे दिसते.
जागतिक लोकसंख्या दिन : जनजागृती करूनही अपयशच
महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्वच कामांत महिला या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात पुरूष माघारले असल्याचे दिसते. यावर्षी वर्धा जिल्ह्याला ७ हजार ७१७ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा ६ हजार ३६३ जणांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. पुरुष नसबंदीचे ६२० उद्दिष्ट असताना केवळ १२० पुरुषांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याचे दिसून आले आहे. या आकडेवारीवरुन कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबाबत पुरुष उदासीन असल्याचे स्पष्ट होते.
दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी गर्भ निरोधक गोळ्यांचा वापर करणे, निरोधचा वापर करणे, दोन अपत्यावर शस्त्रक्रिया करणे, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया आदी विषयांवर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्यावतीने प्रचार-प्रसार केल्या जात आहे. परंतु, सदर शस्त्रक्रियेकडे जिल्ह्यातील बहुसंख्य पुरुष पाठ दाखवित असल्याने होत असलेला प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. यंदा वर्धा तालुक्याला २ हजार ४५५, सेलू तालुक्याला ८९५, देवळी १ हजार ६२, आर्वी ९६७, आष्टी ४५८, कारंजा(घा.) ६७२, समुद्रपूर ८०२ तर हिंगणघाट तालुक्याला १ हजार ७१७ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी वर्धा तालुक्यात २ हजार ६९५, सेलू तालुक्यात ५७५, देवळीत ६७८ आर्वीत ५१६, आष्टीत २९१, कारंजा (घा.) तालुक्यात ४३६, समुद्रपूर येथे १६७ तर हिंगणघाट तालुक्यात ९६३ महिला-पुरुषांनी कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
शस्त्रक्रिया करणाऱ्याला मिळते रोख बक्षीस
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषाला केंद्र शासनाकडून १ हजार १०० व राज्य शासनाकडून ३५१ असे एकूण रोख १ हजार ४५१ रुपये मानधन स्वरूपात बक्षीस दिल्या जाते. एससी, एसटी, बीपीएल प्रवर्गातील महिलांना ६५० रुपये, तर इतर महिलांना २५० रुपये मानधन दिले जाते. पुरुषांना मोठे मानधन दिले जात असले तरी महिलांच्या तुलनेत पुरुष सदर शस्त्रक्रिया करण्याकडे दुर्लक्षच करीत आहे.
शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यास दिले जाते ३० हजार
शस्त्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीने ६० दिवसांच्या आत संबंधित विभागाकडे प्रकरण दाखल करणे आवश्यक असते. त्यानंतर प्राप्त झालेली प्रकरणे राज्य समितीकडे पाठविली जातात. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत झाल्यास शासनाकडून २५ हजार रुपये मर्यादेपर्यंतचा खर्च केला जातो. सदर शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यास त्याला ३० हजार रुपये दिले जात असल्याचे सांगण्यात आले.
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सोपी आहे. या शस्त्रक्रियेसाठी कुठलाही टाका किंंवा चिरा मारावा लागत नाही. शस्त्रक्रिया केल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या आरामाची गरज नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे काम करण्यास अडचण येत नाही. सदर शस्त्रक्रिया केल्यानंतर सायकल, रिक्षा किंवा बस आदी प्रकारचे वाहने चालविण्यासाठी काहीच त्रास होत नाही. या शस्त्रक्रियेला पाच ते दहा मिनिटांचा वेळ लागत असल्याने पुरुषांनी पुढाकार घ्यावा.
- डॉ. अजय डवले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा.