खळबळजनक! एकट्या असलेल्या महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती, मग जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 03:34 PM2022-04-07T15:34:36+5:302022-04-07T18:37:07+5:30
तिने विरोध केला असता आरोपीने खिशातून ज्वलनशील पदार्थ असलेली काचेची बाटली काढून महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आगडब्बीतील काडीने पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
अल्लीपूर (वर्धा) : बळजबरी घरात शिरुन महिलेवर जबरदस्ती करणाऱ्या व्यक्तीला विरोध केल्याने संतापलेल्या नराधमाने महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून तिला पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना अल्लीपूर गावात ५ रोजी घडली. जखमी महिलेवर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांनी दिली.
महिला ही घरात एकटीच आराम करीत असताना गावातीलच रहिवासी आरोपी विठ्ठल संतोष ढेंगरे (५१) याने तिच्या मोबाईलवर फोन करुन तू काय करते आहे, असे विचारुन अवघ्या काही मिनिटांनी आरोपी महिलेच्या घरी आला. त्याने दार ठोठावले महिलेने दार उघडले असता आरोपी विठ्ठल याने महिलेला धक्काबुक्की करीत बळजबरी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने याला प्रतिकार करीत विरोध करुन आरडाओरड करुन तुझ्या पत्नीला ही बाब सांगायला जाते, असे म्हटले. दरम्यान संतापलेल्या विठ्ठलने रागाच्या भरात खिशातून ज्वलनशील पदार्थ असलेली काचेची बाटली काढून महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आगडब्बीतील काडीने पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपी विठ्ठल ढेंगरे याला अटक केली. जखमी महिलेवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंह पाटील करीत आहे.