नात्याला काळिमा! नराधम पित्याकडून पोटच्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 05:34 PM2022-06-27T17:34:19+5:302022-06-27T18:09:04+5:30
पीडित मुलीने आरडाओरड केली असता परिसरातील महिला व तिच्या भावंडांनी धाव घेतल्याने आरोपी आरजू खंडाळकर याने तेथून पळ काढला.
वर्धा : भावंडांना जबरदस्तीने घराबाहेर काढून अवघ्या १२ वर्षीय मुलीचे शोषण करून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक अन् लाजिरवाणी घटना तरोडा गावात घडली. या प्रकरणात हिंगणघाट पोलिसांनी तत्काळ दखल घेत विकृत आरोपीला बेड्या ठोकून पोलिसी हिसका दाखवला.
१२ वर्षीय मुलगी तिच्या भावंडांसोबत घरी खेळत होती. दरम्यान, आरोपी आरजू राजू खंडाळकर रा. तरोडा हा घरी आला आणि मुलीला पिण्यास पाणी मागितले. मुलगी पाणी आणण्यास जाताच आरोपी आरजूने घरात शिरून खेळत असलेल्या तिच्या भावंडांना जबरदस्तीने घराबाहेर काढून दिले आणि मुलीला प्रसाधनगृहाकडे खेचत नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने आरडाओरड केली असता परिसरातील महिला व तिच्या भावंडांनी धाव घेतल्याने आरोपी आरजू खंडाळकर याने तेथून पळ काढला. घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने मुलीला सोबत घेत थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली.
पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य पाहून तत्काळ तपासचक्र फिरवून विकृत आरोपी आरजूला अटक करून बेड्या ठोकल्या. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी भेट देत पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, पोलीस उपनिरीक्षक पपीन रामटेके करीत आहे.