वा रे पठ्ठ्या ! गावची लाइन गेल्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:13 AM2023-07-13T11:13:09+5:302023-07-13T11:15:09+5:30
ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
वर्धा : एरव्ही मोठ्या प्रकरणांसंदर्भात किंवा ज्वलंत समस्येसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन जातात. पण, गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने एका पठ्ठ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फोन लावून कैफियत सांगितली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी बाळा किमान मुख्यमंत्र्यांच्या लायकीचे तरी काम सांग, असे म्हणत त्याची समजूत घातली.
वर्धा जिल्ह्यातील केळझर गावात मुसळधार पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, वारंवार वीज खंडित होत असल्याने गावातील रहिवासी हर्षल नांनावरे याने त्रस्त होत महावितरणचे अभियंता कार्यालय गाठले. पण, सुधारणा न झाल्याने त्याने हिंमत दाखवत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच फोन नंबर मिळवला. त्यांना फोन लावला असता मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी (ओएसडी) यांनी फोन उचलला. त्यांच्याशी बोलून कैफियत सांगितली. हर्षलची समस्या ऐकून ‘ओएसडी’ही चक्रावून गेले आणि बाळा किमान मुख्यमंत्र्यांच्या लायकीचे तरी काम सांग, असे सांगून त्याची समजूत घातली.
सोशल मीडियावर क्लिप व्हायरल
केळझर गावातील तरुणाने गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच फोन लावला. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने फोन उचलला असता समस्या ऐकून तेही चक्रावले. तरुणाची समजूत घालून आम्हीदेखील कंदील अन् बॅटरींच्या लाइटमध्ये अभ्यास केला आणि तुम्ही दोन तास लाइन गेली तर मुख्यमंत्र्यांना फोन करता, असे सांगत त्याची समजूत घातली. सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.