Wardha | मासे पकडण्यासाठी नाल्यावर गेला अन् जीवच गमावून बसला; कळमना शिवारातील घटना
By चैतन्य जोशी | Published: September 10, 2022 05:38 PM2022-09-10T17:38:25+5:302022-09-10T17:44:45+5:30
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : इलेक्ट्रीक वायरच्या सहाय्याने नाल्यातील मासळी पकडत असतानाच वीजेचा जोरदार धक्का लागल्याने व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही भयानक घटना मारडा ते कळमना रस्त्यावर असलेल्या नाल्याजवळ ९ रोजी घडली. याप्रकरणी सिंदी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पंढरी गुलाब वनकर (५५) रा. मारडा असे मृतकाचे नाव आहे.
गणेश विसर्जनानिमित्त कळमना शिवारात असलेल्या नाल्यावर भाविकांची चांगलीच गर्दी उसळली होती. दरम्यान मृतक पंढरी वनकर, लखन भोसले, मिलींद खैरवार हे तिघे संदीप खेडुलकर यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यात मासळी पकडण्यासाठी गेले होते. त्यांनी संदीप खेडुलकर यांच्या शेतातील विहिरीच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक खांबावरील पेटीतील स्विचला वायर जोडून नाल्यातील पाण्यात वायर टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, वायरमधील वीजप्रवाह सुरु असल्याने पंढरी गुलाब वनकर याला वीजेचा जोरदार झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी सिंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करुन पंचनामा करीत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. घटनास्थळावरुन मिळालेले परिस्थितीजन्य पुरावे, मृतकाच्या अंगावरील जखमा तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या बयाणावरुन लखन भोसले, मिलींद खैरवार आणि मृतक पंढरी वनकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास चंद्रशेखर चकाटे करीत आहे.