चोरट्यांचे असेही धाडस; मदत मागून घरात प्रवेश केला अन् चेहऱ्यावर तिखट फेकून टीव्ही पळविला
By आनंद इंगोले | Published: July 21, 2023 05:35 PM2023-07-21T17:35:32+5:302023-07-21T17:38:41+5:30
स्टेशनफैल परिसरात रात्रभर खळबळ
वर्धा : मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक घराचे बंद दार ठोठावून मदत मागितली. घरमालकाने दार उघडताच चोरट्यांनी अचानक अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. त्यातील एकाचे घरातील व्यक्तीच्या चेहऱ्यावर तिखट फेकून घरातील टीव्ही लंपास केला. ही धाडसी चोरी शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजतादरम्यान स्टेशन फैल परिसरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून रात्रभर नागरिकांनी जागते रहो केले.
रुपेश महादेव पखाले (४०) रा. बुद्ध विहारजवळ स्टेशन फैल वर्धा. हे शुक्रवारी मध्यरात्री आपल्या घरी झोपून असताना मध्यरात्री दीड वाजता अज्ञातांनी त्यांच्या घराचे दार ठोठावले. रुपेश यांनी दार उघडण्यापूर्वी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्यामुळे रुपशे यांनी दार उघडताच चोरट्यांनी घरात प्रवेश करुन त्यांच्याशी झटापट केली. इतकेच नाही तर एकाने रुपेश यांच्या चेहऱ्यावर तिखट फेकून घरातील अडीच हजार रुपये किंमतीचा जुना टीव्ही चोरुन नेला. या प्रकरणी रुपेश पखाले यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
अशा चोरीची ही पहिलीच घटना
शहरामध्ये आतापर्यंत चोरी आणि दरोड्याच्या घटना घडल्या आहे. परंतु मध्यरात्री मदत मागून घरात प्रवेश करीत घरमालकाच्या चेहºयावर तिखट फेकून ऐवज पळविण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेने सर्वच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून या घटनेचा आढावा घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे.
नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज
शहरामध्येच नाही तर जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. आता मध्यरात्री किंवा भर दुपारीही कुणीही मदतीच्या नावाखाली घरात प्रवेश करुन लुटमार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तीकरिता घराचे दार उघडताना खबरदारी घेण्याची गरज आहे. दार बंद असल्यावर कुणी दार ठोठावत असेल तर आधी तो व्यक्ती कोण, कशासाठी आलाय याची शहानिशा करुनच दार उघडावे. अन्यथा मदतीच्या नावाखाली घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.