लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार, २५ लाखही उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 05:40 PM2022-02-23T17:40:37+5:302022-02-23T17:56:05+5:30
युवतीला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करून आरोपी सागर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडितेला वारंवार विविध कारणं सांगून तिच्याकडून तब्बल २५ लाख उकळून तिची फसवणूक केली.
वर्धा : विवाह संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीत स्वत:ची खोटी माहिती सांगून पीडित युवतीस लग्नाचे आमिष देत बळजबरी अत्याचार करून विविध कारणातून तिच्याकडून पैसे उकळवून तिची २५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना वर्धा शहरात उघडकीस आली. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी आरोपी युवकास अटक करण्यात आल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांनी दिली.
२९ वर्षीय पीडित युवती ही परिचारिका म्हणून काम करते. तिने लग्नासाठी एका विवाह संकेतस्थळावर प्राेफाईल तयार केली होती. त्या संकेतस्थळावर आरोपी सागर पखान पाटील याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. पीडितेने ती स्वीकारून आरोपीला स्वत:चा मोबाइल क्रमांक दिला. पीडितेने त्याला त्याच्याबाबत माहिती विचारली असता आरोपीने तो पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता असून पुण्याला दोन फ्लॅट असल्याचे सांगितले. तसेच वडील कृषी विभागातून सेवानिवृत्त झाल्याची खोटी बतावणी करून पीडितेला लग्नाचे आमिष देत तिच्यावर बळबजरी अत्याचार केला.
याप्रकरणी पीडितेने सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपी सागर पखान पाटील याला बेड्या ठोकल्याची माहिती दिली असून रामदास पखान, विजया पखान, स्वप्नील पखान, नम्रता पखान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
पीडितेकडून उकळले २५ लाख
पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करून आरोपी सागर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडितेला वारंवार विविध कारणं सांगून तिच्याकडून तब्बल २५ लाख उकळून तिची फसवणूक केली.
विवाहित असतानाही लपविली माहिती
आरोपी सागर याचा विवाह यापूर्वीच झाला असतानाही त्याने ही माहिती लपवून पीडितेला लग्नाचे स्वप्न दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे तर ३ जुलै २०२१ मध्ये पंचमढी येथील एका हॉटेलात नेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, पीडितेच्या लक्षात येताच तिने याबाबतची तक्रार पोलिसात दाखल केली.