मित्रानेच केला घात; डोक्यात काठीने वार करून तरुणाचा खून
By चैतन्य जोशी | Published: September 8, 2022 02:30 PM2022-09-08T14:30:22+5:302022-09-08T14:31:41+5:30
खापरी येथील हत्येच्या घटनेने खळबळ : आरोपीस ठोकल्या बेड्या
वर्धा : शेळ्या चोरल्याचा संशय असल्याने मनात राग पकडून असलेल्या मित्राने दारुच्या नशेत असलेल्या मित्राच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार करुन त्यास यमसदनी पाठविले. ही घटना बुधवारी ७ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास खापरी शेतशिवारात घडली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी ८ रोजी पहाटे ५ वाजता आरोपीस गावातूनच अटक केली. सुरेश देवराव आत्राम (४२) रा. वनग्राम चौकी, ता. हिंगणा जि. नागपूर असे मृतकाचे नाव आहे. तर अविनाश वासकर (२७) रा. खापरी ता. सेलू, असे अटक केलेल्या आरेपीचे नाव आहे.
मृतक सुरेश आत्राम हा त्याच्या आई व पत्नीसह चौकी येथे राहायचा. आणि आरोपी अविनाश वासकर हा खापरी शिवारात राहायचा. ही दोन्ही गावे सिमेलगत असून दोघांच्याही शेती लागूनच असल्याने ते दोघेही चांगले मित्र होते. मृतक सुरेशची आई चौकी येथील ब्रुहस्पती मंदिर परिसरात पुजेचे साहित्य विक्री करण्याचा व्यवसाय करते. मृतक सुरेश याने शेतातून शेळ्या चोरुन नेल्याचा संशय आरोपी अविनाशच्या मनात होता. याच संशयातून त्याने सुरेशचा काटा काढण्याचे ठरविले.
अविनाशने सुरेशला त्याच्या खापरी शिवारात असलेल्या गोठ्याजवळ बोलाविले. दोघांनी तेथे दारु ढोसली. थोडावेळ गोष्टी करीत असतानाच मद्यधुंद अविनाशने सुरेशसोबत वाद करण्यास सुरुवात केली. तु माझ्या मालकीच्या शेळ्या का चोरुन नेल्या असे म्हणत शिवीगाळ करणे सुरु केले. सुरेशने शिवीगाळ करण्यास हटकले असता अविनाशने गोठ्याजवळील बाभळीची काठी उचलून सुरेशच्या डोक्यावर रट्टे मारण्यास सुरुवात केली.
जवळपाच चार ते पाचवेळा सुरेशच्या डोक्यावर काठीने जोरदार रट्टे मारल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सुरेश अविनाशच्या तावडीतून जीव वाचवत पळाला. मात्र, शेतालगत काही अंतरावर असलेल्या नाल्याच्या बाजूला रस्त्यालगत सुरेश कोसळला आणि तेथेच पडून राहिला. याची माहिती सुरेशच्या नातलगांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सुरेशला सावंगी येथील रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी मृतक सुरेशची आई कांताबाई आत्राम यांच्या तक्रारीवरुन सेलू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन गुरुवारी पहाटेच्या सुमारास आरोपी अविनाशला अटक केली.