मनुष्याने वन्यजीवांची निवासस्थाने बळकावली
By admin | Published: October 5, 2014 11:11 PM2014-10-05T23:11:22+5:302014-10-05T23:11:22+5:30
मनुष्याने वन्यजीवांची निवासस्थाने बळकाविली़ यामुळे ते मानवास उपद्रव करतात़ यास माणूसच कारणीभूत आहे़ संपूर्ण सजीव सृष्टीतील प्रत्येक घटक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आपले कार्य चोखपणे बजावत
वर्धा : मनुष्याने वन्यजीवांची निवासस्थाने बळकाविली़ यामुळे ते मानवास उपद्रव करतात़ यास माणूसच कारणीभूत आहे़ संपूर्ण सजीव सृष्टीतील प्रत्येक घटक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आपले कार्य चोखपणे बजावत असतो़ मानवानेही आपले कर्तव्य पाळले पाहिजे, असे मत सामाजिक वनिकरणचे उपसंचालक पी़एऩ बडगे यांनी व्यक्त केले़
न्यू आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त बोर व्याघ्र प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे, बायोटेक विभागप्रमुख प्रा़ वैभवी उघडे उपस्थित होते. वन्यजीव सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम संपूर्ण आठवड्यात महाविद्यालयात राबविले जाणार आहे. या सप्ताहानिमित्त पर्यावरण व वन्यजीव संवर्धन, जैवविविधता, वनसंवर्धन, प्रदूषण आदी सर्व जिव्हाळ्यांच्या प्रश्नावर महा़मध्ये जनजागृतीचे उपक्रम राबविले जाणार आहेत़
कडवे याप्रसंगी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. गौतम बुद्धांनी ज्याप्रकारे मारेकऱ्यांचे विचार परिवर्तन घडवून आणले त्याचा दाखला देत ज्यांना जीव निर्माण करणे शक्य नाही, अशा मानवाने सृष्टीतील कुठल्याही घटकाला इजा पोहोचवू नये व निसर्गाचा ऱ्हास करण्यास कारणीभूत ठरू नये, असा संदेश दिला. बालमनावर संस्कार करून किशोरवयीन मुलांच्या आचरणात विशिष्ट बदल घडवून सृष्टीविषयी प्रेम, जीव्हाळ्याचे नाते निर्माण करणे हे शिक्षण प्रणालीचे आद्यकर्तव्य आहे, असे प्रा. उघडे यांनी सांगितले़
कार्यक्रमात बडगे यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापकांना निसर्ग रक्षणाची शपथ दिली़ यानंतर समाजकार्य विभागातर्फे पर्यावरण व वन्यजीव संरक्षणावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. वन्यजीव सप्ताहांतर्गत वन्यजीव छायाचित्रण, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, महाविद्यालयीन परिसर स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन, माहितीपट सादरीकरण, चित्रकला स्पर्धा, पर्यावरण प्रदूषण, वाईल्ड लाईफ, ट्रॅफिकिंग अॅण्ड पोचिंग आदी विषयावर पराग दांडगे यांचे व्याख्यान, प्रा. किशोर वानखेडे पक्षीमित्र यांचे व्याख्यान व माहितीपट सादरीकरण, असे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत़
कार्यक्रमाला महाविद्यालयातील समाजकार्य, वाणिज्य, कला आदी विभागांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. पेटारे, प्रा. हेटे, प्रा. भोयर, प्रा. सोनोने, प्रा. ठवकर, प्रा. इंगोले, प्रा. पुसदेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)