दोन दिवस तापाने फणफणला, रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 02:18 PM2023-11-22T14:18:43+5:302023-11-22T14:19:31+5:30

परसोडा गावात हळहळ : दिवाळीकरिता गावाकडे आला अन् नियतीने डाव साधला, कुटुंबातील कर्तबगार मुलगा गेल्याने धक्का

man was suffering from fever for two days, took his last breath during treatment in the hospital! | दोन दिवस तापाने फणफणला, रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला!

दोन दिवस तापाने फणफणला, रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला!

नीलेश कोहळे

आष्टी (शहीद) : तालुक्यातील परसोडा या छोट्याशा गावात जन्मलेल्या मुलाने शेतकरी बापाच्या कष्टाची कदर करून शिक्षण घेतले. शासकीय नोकरीच्या मागे न लागता अमरावतीसारख्या शहरात भोजनालय टाकून स्वयंरोजगाराची कास धरून आई-वडिलांना आर्थिक आधार दिला. त्यामुळे या कर्तृत्ववान मुलाने गावकऱ्यांच्या मनातही जागा निर्माण केली होती. अशातच तो परिवारासोबतच दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावाकडे आला. दोन दिवस तापाने फणफणत राहिल्याने रुग्णालयात दाखल केले असता रविवारी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्याच्या या आकस्मिक मृत्यूने परिवारच नाही तर अख्खं गाव हळहळलं. परसोडाकरांनी साश्रूनयनाने त्याला अखेरचा निरोप दिला.

भूषण पंडित गोरे (३२, रा. परसोडा) असे या मृत युवकाचे नाव आहे. त्याचे वडील पंडित गोरे यांच्याकडे आठ एकर शेती असून त्यांना दोन मुली व एक मुलगा, असा आप्तपरिवार आहे. त्यांनी मुलांना शिक्षण दिल्यानंतर शेतीकडे वाटचाल कायम ठेवली. भूषण याने वडिलांचे काबाडकष्ट पाहून शासकीय नोकरीची प्रतीक्षा न करता अमरावतीमध्ये भोजनालय सुरू करून अर्थार्जन सुरू केले. सोबतच पाच व्यक्तींना कायमचा रोजगारही दिला. सोबतच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याचेही काम सुरू केले.

विनम्र आणि सेवाभावी असलेल्या भूषणच्या स्वभावामुळे त्याने अनेकांच्या मनात घर केले होते. यामुळेच त्याचा व्यवसायही भरभराटीस आला होता. दिवाळीला भूषण गावाकडे आला. त्याला अचानक ताप आल्याने दोन दिवस फणफणला. ताप आणखीच वाढल्याने तातडीने अमरावती येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची वार्ता गावात पसरता गावात शोककळा पसरली. अचानक भूषण आपल्यातून निघून गेल्याच्या घटनेवर अनेकांना सुरुवातीला विश्वासही बसला नाही; पण वार्ता खरी ठरल्यानंतर साऱ्यांवरच दु:खाचा डोंगर कोसळला. रविवारी गावकऱ्यांनी साश्रूनयनांनी भूषणला अखेरचा निरोप दिला. आ. दादाराव केचे यांनीही परिवाराची भेट घेऊन सात्वन केले. भूषणच्या अचानक जाण्यामुळे ग्रामीण भागामध्ये तापाची साथ जोर धरू लागली, हे आता स्पष्ट झाले असून सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे भूषणचे वडील पंडित गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गावकऱ्यांचा उपवास, चुली पेटल्याच नाही!

गावातील भूषण पंडित गोरे या अविवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरताच सारेच स्तब्ध झाले. गावकऱ्यांसह दिवाळीनिमित्ताने गावात आलेल्या पाहुण्यांनीही हळहळ व्यक्त केली. गावात भूषणवर अंत्यसंस्कार होईस्तोवर गावातील एकाही घरामध्ये चूल पेटली नसल्याने साऱ्यांनीच उपवास धरला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सारेच एकत्र आले. आजूबाजूच्या गावातील नागरिकही त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. त्याच्या निधनाने परिवाराचा आधार हिरावल्याचे दु:ख अनेकांनी बोलून दाखविले.

Web Title: man was suffering from fever for two days, took his last breath during treatment in the hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.