महिलेच्या वेशातील पुरुषाने दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:02 AM2017-11-27T01:02:04+5:302017-11-27T01:02:18+5:30

A man in a woman's clothing robbed ornaments | महिलेच्या वेशातील पुरुषाने दागिने लुटले

महिलेच्या वेशातील पुरुषाने दागिने लुटले

Next
ठळक मुद्देशेतात कापूस वेचत होती महिला

ऑनलाईन लोकमत 
आकोली : चोर चोरी करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या वापरत असतात. असाच काहीसा प्रकार खरांगणा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या कामठी शिवारात घडला. शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेला एका पुरूषाने महिलेच्या वेशात येत गंडा घातल्याचे समोर आले. या चोरट्याने महिलेचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
उषा नरेंद्र कोसुळकार (३१) रा. कामठी ही महिला दुपारच्या सुमारास कामठी शिवारातील स्वत:च्या शेतात कापूस वेचत होती. ती आपल्या कामात गुंग असताना तिच्यासमोर अचानक साडी घातलेला, डोक्यावर पदर व तोंडाला स्कार्फ बांधलेला पुरुष पाठीमागून आला व चुपचाप तुझ्याजवळ जे असेल ते दे. आरडा-ओरड करू नको, अशी दमदाटी केली. यामुळे महिलेने गळ्यातील दीड ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, एक ग्रॅम सोन्याचे मनी व साडेतीन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप, असा एकूण ३ हजार ५०० रुपयाचा ऐवज काढून दिला. हा ऐवज घेवून स्त्री वेशातील चोरटा पसार झाला. घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात जमादार ओमप्रकाश इंगोले, जमादार दिनेश गायकवाड या संशयीत चोरट्याचा शोध घेत आहेत. सदर घटनेने कापूस वेचणाऱ्या महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गत वर्षी याच हंगामात महिला कामाला गेल्या असताना घरातून ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या. यंदा चोरट्यांनी नवी पद्धत अंमलात आणल्याने शेतमजूर महिला दहशतीत आल्याचे दिसत असून पोलिसांनी चोरटे पकडणे गरजेचे झाले आहे.
महिलांमध्ये भीतीचे वातावरण
सध्या कापूस वेचनीचा हंगाम सुरू आहे. मजुरांची कमतरता असल्याने ग्रामीण भागातील महिला त्यांच्या शेतात तर काही महिला दुसºया शेतकऱ्यांच्या शेतात कामाकरिता जात आहेत. शेतात कापूस वेचताना महिलांची संख्या कमी असल्याने त्या दूर-दूर असतात. यात चोरीचा हा प्रकार घडल्याने महिलांत भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. यामुळे पोलिसांनी या चोरट्याला पकडून महिलांच्या मनात असलेली भीती कमी करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: A man in a woman's clothing robbed ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.