वर्ध्याच्या मंगेशीने जागविली पारध्यांमध्ये जगण्याची उमेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:27 PM2018-01-29T13:27:14+5:302018-01-29T13:31:51+5:30
वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पारधी समाज वास्तव्याला आहे. अशा समाजाला मदत करण्याचा विडा वर्धा जिल्ह्यातील मंगेशी पुसाटे-मून या तरुणीने उचलला आहे.
अभिनय खोपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पारधी समाज वास्तव्याला आहे. हा समाज अतिशय दुर्लक्षीत व शासनाच्या दप्तरीही विविध योजनांपासून वंचित आहे. अशा समाजाला मदत करण्याचा विडा वर्धा जिल्ह्यातील मंगेशी पुसाटे-मून या तरुणीने उचलला. तिच्या पुढाकाराने वर्धा तालुक्यातील रोठा येथे संकल्प वसतीगृहाची उभारणी करण्यात आली.
भीक मागणारे, भंगार वेचणारे, दारू व्यवसाय करणाऱ्या पारधी समाजातील मुलांसाठी या वसतीगृहात व्यवस्था करण्यात आली आहे. या मुलांमध्ये इतर समाजातील मुलांसारखे जगण्याची उमेद निर्माण करण्याचे काम या वसतीगृहाच्या माध्यमातून सुरू आहे. पारधी समाजातील अनेक मुले रस्त्यावर भीक मागून जगत असल्याचे दिसून येते. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सध्या मंगेशीचे काम सुरू आहे. या मुलांचे कागदपत्र पूर्ण नसतात त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही.
हे कागदपत्र जमा करून देण्यासाठी त्यांच्या आई-वडीलांची तयारीही नसते. सतत फिरस्ती त्यांच्या नशीबी आली असल्याने त्यांच्या घराची ना कुठे नोंद आहे अशी स्थिती असताना या मुलांचे जन्माचे दाखले ग्रामपंचायतमधून मिळविण्यापासून सर्वच काम मंगेशींना करावे लागते. दरररोज सकाळी ७ वाजता पारधी बेडे गाठून आई-वडीलांना सर्व माहिती समजावून देत त्यांचे कागदपत्र तयार करण्याचे काम त्यांनी चालविले आहे. वर्धा परिसरात सुरू होणाऱ्या या शाळेत शंभर मुल-मुली यावर्षी शिकतील.या कामाची जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही दखल घेवून तेथे भेट दिली, अशी माहिती मंगेशी पुसाटे-मुन यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मुंबई सोडून मुलांसाठी सुरू केले काम
पतीसोबत मुंबईत राहणारी मंगेशी ही नोकरी करत होती. तिला दोन मुले आहेत. मात्र नोकरीसोडून गाव गाठले आणि जवळचे दागिने मोडून पारधी वस्तीतील मुलांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. व यांच्यासाठी प्रकल्प उभा करण्याचा निश्चय केला. यासाठीची जागा तिच्या आई-वडिलांनी दिली. आता १०० विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे.
संकल्प संस्थेच्या माध्यमातून पारधी मुलांचे संगोपन व शिक्षण कार्य सुरू करण्यात आले आहे. या कार्याला समाजातील मान्यवरांनी सहकार्य करावे, जेणेकरून या वाड्या, वस्तीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होईल. आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. लवकरच याचा रिझल्टही मिळेल. यात सर्वांचे सहकार्य हे मोठे बळ आहे.
- मंगेशी फुसाटे, मून, सामाजिक कार्यकर्ते.
वडिलांच्या दानातील जमिनीवर बांधकाम
या पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुळ विचारधारेत आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मंगेशीच्या वडीलांनी तिच्या या कामात सहकार्य करण्याचा विडा उचलला व मुलीची ही धडपड पाहून त्यांनी वसतीगृहाच्या कामासाठी जमीन दान केली. तेथे दोन मोठ्या खोल्या व शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या महिलांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. या बांधकामासाठी मंगेशी व तिच्या पतीने दोन लाख रूपयाचे सोने गहान ठेवले तर पतीने आठ लाख रूपयाचे कर्ज घेवून हे बांधकाम सुरू केले. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.