मंगेशची आत्महत्या नसून हत्याच; ग्रामस्थांचा आरोप
By admin | Published: June 25, 2014 11:55 PM2014-06-25T23:55:10+5:302014-06-25T23:55:10+5:30
वर्धपूर-वडाळा येथील मंगेश डाखोरे या २५ वर्र्षीय युवकाचा मृतदेह अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या विहिरीत आढळला़ या प्रकरणात मंगेशच्या हत्येला जबाबदार व दोषी असलेल्या आरोपींना गुन्हा
आष्टी (श़) : वर्धपूर-वडाळा येथील मंगेश डाखोरे या २५ वर्र्षीय युवकाचा मृतदेह अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या विहिरीत आढळला़ या प्रकरणात मंगेशच्या हत्येला जबाबदार व दोषी असलेल्या आरोपींना गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा, अशी मागणी ग्रामस्थांनी ठाणेदारांना केली़ यासाठी सुमारे १०० ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली़
बुधवारी वर्धपूर-वडाळा येथील नागरिक मोठ्या संख्येने आष्टी पोलीस ठाण्यात दाखल झाले. ग्रामस्थांनी मंगेशची आत्महत्या नसून हत्याच झाल्याची माहिती ठाणेदार रमाकांत दुर्गे यांना दिली. लगेच पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे, शिपाई मंगेश राऊत गावात पोहोचले़ मंगेशचा मृतदेह ज्या विहिरीत आढळला, त्या ठिकाणापासून ४०० मीटर अंतरावर त्याचे शेत आहे. मारहाण झाली, त्या ठिकाणी पोलिसांना रक्ताचे डाग व चप्पल मिळाली़ शवविच्छेदन अहवाल अद्याप आला नाही़ यामुळे नेमका मृत्यू कशाने झाला, हे अहवाल आल्यानंतरच कळेल, असे पोलिसांनी सांगितले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार मंगेश वडाळा गावातून वर्धपूरकडे जात असताना त्याचे सत्तरपूर फाट्याजवळ शेत आहे. मंगेश सायकलवर प्रवास करीत होता. त्याला काठीने मारून जखमी करण्यात आले. यानंतर शेतात नेऊन शस्त्रांनी जबर मारहाण करण्यात आली़ यात त्याचा मृत्यू झाला़ मृतदेहाची माहिती कुणालाही मिळू नये म्हणून धरणाच्या बुडित क्षेत्रातील विहिरीत टाकला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंगेशच्या मित्रांनी व घरातील एका व्यक्तीने हत्येचा बेत आखल्याची चर्चा आहे. मंगेशच्या डोक्याला खोलवर जखमा आहे. मारहाण झाल्याने रक्त सांडले, हे आता स्पष्ट झाले आहे.
ग्रामस्थांनी प्रकरण रेटून धरल्याने सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी वर्र्धपूरच्या नागरिकांनी केली आहे. ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले असून मंगेशच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)