माणिकवाडा-तारासावंगा रस्ता खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:42 AM2018-05-12T00:42:41+5:302018-05-12T00:42:55+5:30
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा-तारासावंगा हा रस्ता पूर्ण उखडल्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच नियोजित ठिकाणी जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा-तारासावंगा हा रस्ता पूर्ण उखडल्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच नियोजित ठिकाणी जावे लागत आहे. गत दोन वर्षांपासून सदर रस्त्याच्या दुरूस्तीकडे जि.प.च्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून ग्रामस्थांची समस्या लक्षात घेता तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी आहे.
माणिकवाडा ते तारासावंगा हे अंतर ६ कि़मी. आहे. त्यापैकी २ कि़मी. रस्ता पूर्णत: उखडला आहे. या रस्त्याची रुंदी पूर्वी तीन मिटर होती; पण आता दोन्ही बाजू दबल्याने दोन मिटर झाल्याचे दिसते. या मार्गाने वाहनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय रस्ताही अरुंद झाल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सरपंचासह काही ग्रामस्थांनी संबंधितांना निवेदने दिली. मात्र, तेही दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत. आतापर्यंत सदर रस्त्यावर छोटे-मोठे सुमारे ४० अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता रस्त्याच्या दुरूस्तीच्या मागणीचे निवेदन संबंधितांना देण्यात आले. परंतु, तेही दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांची समस्या कायम आहे. विशेष म्हणजे, जि. प. बांधकाम विभागाच्या विरोधात निषेध ठराव घेऊन तो राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. जि. प. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण होत असून त्यावर आता काय कार्यवाही होते तसेच संबंधित अधिकारी ग्रामस्थांची समस्या किती तातडीने निकाली काढतात याकडे साºयाचे लक्ष लागले आहे.