पाणवठ्यांवरील नायलॉन जाळ्यांनी अनेक पक्षी झाले अपंग
By admin | Published: March 7, 2017 01:17 AM2017-03-07T01:17:43+5:302017-03-07T01:17:43+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात अनेक पक्षी पाणी असलेल्या पाणवठ्यांवर येत आहेत;
संकटग्रस्त स्थळांच्या यादीत वाढ : तलावांच्या लिलावात चिंतन गरजेचे
वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात अनेक पक्षी पाणी असलेल्या पाणवठ्यांवर येत आहेत; पण या पाणवठ्यांवर असलेल्या नायलॉन जाळ्यांमुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. या जाळ्यांमुळे अनेक पक्षी अपंग झाल्याचे समोर आले आहे. या जाळ्यांमुळे पक्ष्यांच्या संकटात आणखी वाढ होत असल्याचे पक्षी अभ्यासक वैभव देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
जिल्ह्यातील अनेक पाणवठ्यांवर असे दृश्य पाहायला मिळत आहे. या प्रकाराने अनेक पक्ष्यांचा जीव जात असून असंख्य पक्ष्यांना कायमचे अपंगत्व येत असल्याचे निरीक्षण देशमुख यांनी नोंदविले आहे. हजारो किलोमिटरचा प्रवास करून स्थलांतरीत आणि स्थानिक पक्षी यामुळे अपंग झाल्याचे दिसून आले आहे.
एका लहानशा पाणथळ्यावर चार पक्ष्यांना पायाने अपंगत्व आल्याचे आढळून आले. पांढऱ्या मानेचा करकोचा, शेकाट्या व पांढऱ्या भुवईचा धोबी या तीन पक्ष्यांचा आकार अगदी वेगवेगळा असला तरी त्यांच्यात एक साम्य आढळून आले. ते म्हणजे तीनही पक्ष्यांच्या पायाला आलेले अपंगत्व! या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केले असता हे तीनही पक्षी प्रजाती उथळ पाण्यात अथवा पाण्याच्या काठावर खाद्याच्या शोधात असतात. नेमके पाण्याच्या काठावरच बारिक आणि पारदर्शक नायलॉनचे मासोळ्या पकडण्याचे जाळे मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त फेकलेले असतात. भक्ष्याच्या शोधात मग्न पक्षी नकळत यात अडकतात. त्यातून मृत्यू वा अपंगत्व येत असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.
जाळ्यात फसलेला पाय काढण्याचा जितका अधिक प्रयत्न पक्षी करतात, तितके त्यांचे पाय अधिक घट्ट आवळले जातात. यात पक्ष्यांच्या पायाची हाडे तुटतात. रक्ताभिसरण न झाल्याने संपूर्ण पाय निकामी होतात. शिवाय पांढऱ्या भुवईचा धोबी या चिमणीच्या आकाराच्या नुकतेच घरटे सोडून बाहेर पडलेल्या पक्ष्याच्या पायाला नायलॉनचा दोरा घट्ट आवळल्यामुळे गाठ तयार झालेली स्पष्टपणे दिसून येते, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
तलावांचा लिलाव करताना जैवविविधतेला कुठलाही धोका होणार नाही, यांबाबतची नियमावली व कडक निर्बंध घालण्यात यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)