अत्यल्प किमतीमुळे अनेकांचा कापूूस घरीच
By admin | Published: December 27, 2014 02:17 AM2014-12-27T02:17:02+5:302014-12-27T02:17:02+5:30
नापिकी, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ व अत्यल्प हमीभाव यामुळे खरिपाची दैना झाली.
रोहणा : नापिकी, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ व अत्यल्प हमीभाव यामुळे खरिपाची दैना झाली. त्यामुळे दृष्टचक्रात सापडलेले रोहणापरिसरातील शेतकरी कृषी मूल्य आयोग कापसाचा हमीभाव केव्हा वाढविणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहे. अनेकांनी अद्यापही कापूस विकला नसून शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहे.
कापूस बियाणे सातशे रूपये प्रति बॅग वरून रू़ ९५०, बैल जोडीद्वारा पेरणी भाडे रू़५०० वरून १२००, डी़ए़पी़ रासायनिक खत ६०० वरून ११८४, फवारणीच्या कीटकनाशकांच्या किंमतीत सुमारे २५ टक्के झालेली वाढ, महिलांची मजुरी १०० वरून १५० तर पुरूषांची मजुरी १५० वरून २५० रुपयांपर्यंत गेली. त्यामुळे उत्पादन खर्च भरमसाठ वाढला. प्रथम पावसाची दडी, नंतर अतीपाऊस, त्यानंतर वादळी पाऊस या नैसर्गिक संकटामुळे प्रचंड नापिकी व अत्यल्प उत्पादन या पार्श्वभूमीवर कापसाचे हमीभाव मागील तीन वर्षात ५० च्या फरकाने वाढवून ४ हजार ५० केले. मागील वर्षी कापूस उत्पादकांना खाजगी व्यापाऱ्यांनी रू़ ५ हजार ५०० पर्यंत भाव दिले़ जागतिक मंदीचे कारण पुढे करत खाजगी व्यापारी कापूस घेण्यास उत्सुक नाही़ शासनाने का कू करत काही मोजक्याच केंद्रांवर ४ हजार ५० रुपये हमीभाव देत कापूस खरेदी सुरू केली़
हा भाव कापूस उत्पादकांना अजिबात परवडणारा नाही़ त्यामुळे अनेकांनी आपला कापूस अद्याप विकायला न काढता घरीच ठेवला आहे. पण नाईलाज म्हणून काहींना तो मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.(वार्ताहर)