प्रियदर्शिनीचे वर्धा जिल्ह्याशी अनेक ऋणानुबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:08 PM2017-11-18T23:08:25+5:302017-11-18T23:08:59+5:30
‘प्रियदर्शिनी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या इंदिरा गांधी यांचे वर्धा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : ‘प्रियदर्शिनी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या इंदिरा गांधी यांचे वर्धा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. आणीबाणीचा काळ असो वा सत्ता उपभोगण्याची वेळ असो, त्या वर्धेत आल्याचेच दिसून आले आहे. येथील सेवाग्राम आश्रम आणि भूदानाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम इंदिरा गांधींकरिता नेहमी उर्जेचे स्त्रोतच राहिला आहे.
इंदिराजींना दिली पवनारने संजीवनी
इंदिरा गांधी व संजय गांधी यांचा पराभव झाल्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार आले. या काळात इंदिरा गांधी एकट्या पडल्या होत्या. त्यांनी वर्धा येथून पवनार आश्रमात आचार्य विनोबा भावे यांची भेट घेतली व येथून सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याचे निश्चित केले. त्यानंतर काँग्रेसला देशात प्रचंड मोठा जनाधार मिळाला. सत्ता जात-येत असते; पण आपले पाय जमिनीवर कायम असावे लागतात, असा उल्लेख इंदिरा गांधी जयंतीच्या पुर्वसंध्येला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी वर्धा येथे केला.
विनोबांकडून इंदिराजींना अनेकदा मार्गदर्शन
आचार्य विनोबा भावे यांनी इंदिरा गांधींना सत्तेवर असताना व नसतानाही अनेकदा मार्गदर्शन केले. इंदिरा गांधींनी १९७५ ते ७७ या काळात लागू केलेल्या आणीबाणीलाही विनोबांनी अनुशासन पर्व, असे सांगून त्यांचे समर्थन केले. इंदिरा गांधीजींच्या अडचणींच्या काळात त्या नेहमीच सेवाग्राम व पवनार आश्रमला भेट देत होत्या. त्यांनी वर्धा जिल्ह्याशी आपली नाळ कधीही तुटू दिली नाही.
सेवाग्राम आश्रमात वृक्षारोपण आणि संदेश
सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमात येत त्यांनी अनेकवेळा सभा घेतल्या. येथे आल्यानंतर त्यांनी १४ आॅक्टोबर १९७२ रोजी वृक्षारोपण केले. त्यांनी लावलेले बेलाचे वृक्ष आज इतरांना फळ देणारे ठरत आहे. हा बेल वृक्ष आश्रम परिसरात असून त्यावरील पाटी सर्वांना इंदिरा गांधी यांची आठवण करून देणारी ठरत असल्याचे आश्रम प्रतिष्ठान सांगत आहे.
केळीचा घड भेट
इंदिराजी नागपूरवरून पवनारकडे येताना सेलू येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करताना ८० किलो वजनाचा केळीचा घड भेट दिला. यावेळी खजिनदार सीताराम केसरी हजर होते. इंदिराजींनी ‘इंदिरा दिल्ली मे क्या कर रही है ये आप गाँव मे देख सकेंगे’, असा उल्लेख केला. त्यावेळी दिल्लीत कृष्णधवल टेलीव्हीजन सुरू झाले होते.