कुंपणाला चिकटून अनेकांचे जीव गेले; करंट लावणार त्याला 'झटका' देणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 17:07 IST2024-11-08T17:02:15+5:302024-11-08T17:07:39+5:30
महावितरण : पिकांची नासाडी रोखण्यासाठी अनेक जण सोडतात कुंपणात वीज प्रवाह

Many lost their lives clinging to the fence because of electric current but who use it will get punished
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वन्य प्राण्यांपासून होणारी पिकांची नासाडी रोखण्यासाठी काही शेतकरी कुंपणात वीज प्रवाह सोडत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. परंतु, त्यामुळे वन्य प्राण्यांबरोबरच शेतात कामासाठी गेलेल्या आणि अनावधानाने कुंपणाला स्पर्श करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू होत असल्याची बाब समोर आली आहे.
शिवाय यासाठी आकडे टाकून वीजही चोरून वापरत असल्याचे दिसून आले आहे. याची महावितरणने गंभीर दखल घेतली असून, यापुढे कुंपणात अनधिकृत वीज प्रवाह सोडलेला आढळल्यास संबंधितावर विद्युत कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मागील काही महिन्यांपासून विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता, महावितरणच्या असे लक्षात आले की, शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज प्रवाह थेट कुंपणात सोडतात. त्यामुळे अनावधानाने संपर्कात आलेल्या प्राण्यांसोबत शेतकऱ्यांचाही मृत्यू झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. एकंदरीत हा प्रकार वाटतो तितका साधा नसून वीजचोरीबरोबरच सदोष मनुष्यवधासारख्या गंभीर गुन्ह्याशी संबंधित आहे. तसेच जीवितहानी झाल्यानंतर त्याचा दोष विनाकारण महावितरणला देण्याचा आणि महावितरणकडून भरपाई मागण्याकडे कलदेखील दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध राहण्याची आवश्यकता आहे.
आकडे टाकाल तर खबरदार...
वीज वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकडे टाकून कुंपणात थेट वीज प्रवाह सोडण्याच्या या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे. यासाठी तांत्रिक कर्मचारी तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून शेतशिवारात गस्त घालण्यात येणार आहे.
तर होणार गुन्हा दाखल
आकडे टाकून कुंपणात वीज प्रवाह टाकल्याबाबतचा प्रकार आढळला तर संबंधित शेतकऱ्यावर विद्युत कायदा २००३ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच संभाव्य जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिस विभागाला करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.