महिलांच्या न्याय रक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा मंत्रालयावर धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 03:41 PM2020-02-16T15:41:36+5:302020-02-16T17:16:06+5:30
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हिंगणघाट जळीत कांडातील पिडीत तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दारोडा येथे आज आले होते.
हिंगणघाट - हिंगणघाट येथे घडलेल्या प्राध्यापक तरुणीवर झालेल्या अत्याचारासोबतच राज्यातील महिला व मुलींच्या न्याय रक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाद्वारे 27 फेब्रुवारीला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील (परळी) हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हिंगणघाट जळीत कांडातील पिडीत तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दारोडा येथे आज आले होते. सदर कुटुंबियांना मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने दिलासा देण्यात आला. त्या नंतर हिंगणघाट येथे झालेल्या वार्ताहर परिषदेत या संदर्भातील मागण्या 26 फेब्रुवारी पर्यंत मान्य न झाल्यास 27 फेब्रुवारीला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असे आबासाहेब पाटील यांनी जाहीर केले.
पिडीत कुटुंबाला 25 लाख रुपयांची त्वरीत मदत करण्यात यावी,पिडीतेच्या भावाला शासनाने तात्काळ शासकिय नोकरी द्यावी,या प्रकरणाचे आरोप पत्र तात्काळ न्यायालयात दाखल करण्यात यावे, प्रकरणाची तात्काळ जलद गती न्यायालयातुन सुनावणी करण्यात यावी,सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात यावे इत्यादी मागण्यांसोबतच महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने यापुढे महाराष्ट्र शासनाने अशा घटनेतील आरोपीला एक महिन्यात फाशीची शिक्षा करण्याचा कायदा करावा अशा मागण्या मराठा ठोक मोर्चाद्वारे पुढे करण्यात आल्या आहेत. या वार्ताहर परिषदेला संघटनेचे राज्य कार्यकारीणी पदाधिकार्यां सोबतच हिंगणघाटचे शरदराव शिर्के, प्रविन काळे व अक्षय भांडवलकर यांचीही उपस्थिती होती.