विवाहितेच्या मृतदेहाने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:58 PM2018-12-10T23:58:03+5:302018-12-10T23:58:27+5:30
स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्या विवाहितेचा महामार्ग क्रमांक ७ वरील कानकाटी शिवारात वना नदीच्या पुलाखाली संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्या विवाहितेचा महामार्ग क्रमांक ७ वरील कानकाटी शिवारात वना नदीच्या पुलाखाली संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
संज्योती पुनेश्वर तामगाडगे (३२) रा. कानकाटी असे मृतक महिलेचे नाव आहे. तिचा पती मागील चार ते पाच वर्षापासून पवनी (मांढळी) येथे राहत असून ती दोन मुलांसह कानकाटी येथील भाऊ निकेश डंभारेकडे राहत होती. मृतक संज्योती पती व मुलांसह ५ डिसेंबरला मुंबईला गेले होते. तेथून ते ९ डिसेंबरला परत आले. हिंगणघाटला पोहोचताच पती पुनेश्वर पवनीला निघून गेला तर हे तिघेही मायलेक कानकाटीला आले. मृतकच्या वहिणीला मुलगी झाल्याने ती हिंगणघाटच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तिचा डबा घेऊन ती रविवारी दुपारी १.३० वाजता रुग्णालयात पोहोचली. तेथून सायंकाळी ५.३० वाजता कानकाटीला जाण्यासाठी निघाली. पण, रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचलीच नाही. त्यामुळे भावाने व मुलांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र, संपर्क झाला नाही. शेवटी सोमवारी सकाळी ८ वाजतादरम्यान कानकाटीच्या नदी पुलाखाली महिलेचा मृतदेह असल्याची वार्ता गावात पसरली. त्यामुळे तिच्या मुलाने लगेच घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली असता त्याला आईचाच मृतदेह आढळून आला. संशयास्पद असलेल्या या मृतदेहावरुन अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. माहिती मिळताच समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस उपनिरिक्षक मिलींद पाराडकर, अमोल खाडे, अरविंद येणुरकर, आशिष गेडाम, धनंजय पांडे, विरु कांबळे, रंजना झिलपे, धारणे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला. यावेळी प्रयोगशाळा तज्ज्ञ एस.सी.साठवणे, मंगेश धांमद, आशिष उमेकर व श्वानपथक दाखल झाले होते. पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस उपनिरिक्षक मिलींद पाराडकर करीत आहे.