बाजार समितीला मागील वर्षी ८.१५ कोटींचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:44 PM2017-10-14T23:44:38+5:302017-10-14T23:44:48+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची १४ वी वार्षिक आमसभा शिवाजी मार्केट यार्डवरील शेतकरी निवास येथे पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची १४ वी वार्षिक आमसभा शिवाजी मार्केट यार्डवरील शेतकरी निवास येथे पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती अॅड. सुधीर कोठारी तर अतिथी म्हणून माजी आमदार प्रा. राजू तिमांडे उपस्थित होते. यावेळी सर्व सुविधांसाठी खर्च करूनही बाजार समितीला २०१६-१७ मध्ये ८.१५ कोटींचा नफा मिळाल्याची माहिती देण्यात आली.
अॅड. कोठारी यांनी समितीचा २०१६-१७ चा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. यात समितीने राबविलेल्या विविध योजना, शेतकºयांचा सहभाग व झालेली वार्षिक उलाढाल, २०१५-१६ चा लेखापरिक्षण अहवाल, जमा-खर्च व ताळेबंद तसेच समिती आवारात सुरू असलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली. पूढील वर्षात प्रस्तावित विकास कामे, योजनांची माहितीही दिली. शेतमाल तारण कर्ज योजनेची राज्य शासनाने दखल घेतली असून समितीला नागपूर विभागात उत्कृृष्ट काम केल्याबाबत १४ सप्टेंबर रोजी पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. बाजार समिती संघामार्फत उत्कृष्ट कामगिरीबाबत कै. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. समितीच्या कार्याचा अजित पवार, सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख व विजय दर्डा यांनी उल्लेख केला. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत प्रायोगिक तत्वावर संगणकीकृत लिलाव पद्धतीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्यात हिंगणघाट, आकोट, चिखली, धामणगाव व राहता या पाच बाजार समित्यांची पहिल्यांदा निवड झाली होती. सध्या त्याच धर्तीवर ई-नाम अंतर्गत ३० व एमएसीपी अंतर्गत २९ अशा ५९ बाजार समित्यांत या लिलाव पद्धतीची अंमलबजावणी सुरू झाल्याचे दिसते. येत्या हंगामापासून कापसातही संगणकीकृत लिलाव पद्धतीचा अवलंबिण्याचा समितीचा मानस असून प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगितले. समितीने २०१६-१७ मध्ये १४५६ कोटी रुपयांची उलाढाल केली असून खर्च वजा जाता ८ कोटी १५ लाख ६१ हजार १४१ रुपये शुद्ध नफा झाला आहे. स्पर्धा व आव्हाने लक्षात घेता उत्पन्न वाढविणे, टिकविणे कठीण आहे. असे असले तरी २०२० पर्यंत उलाढाल दोन हजार कोटींवर नेण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगितले.
तिमांडे यांनी बाजार समिती शेतकरी हा केंद्रबिंदु मानून काम करीत असून ती पद्धत इतर बाजार समित्या अवलंबित असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यातील सरपंच, वि.का. सोसायटीचे अध्यक्ष, व्यापारी, अडते व हमाल, मापारी यांनी समाधान व्यक्त केले. संचालन तुकाराम चांभारे यांनी केले तर आभार हरिष वडतकर यांनी मारले. यावेळेस समुद्रपूर समितीचे सभापती हिंमत चतुर, संचालक मधुकर डंभारे, मधुसूदन हरणे, उत्तम भोयर, शेषकुमार येरलेकर, डालिया, सातोकर, वानखेडे, उपासे, मंगेकर, नासर, वैद्य, महाजन आदी उपस्थित होते.
यावर्षी पुन्हा दोन नवीन योजनांचा शुभारंभ
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षी दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. यात निव्वळ शेती हाच एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या शेतकºयांच्या पाल्यांना अनुदान तत्वावर शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवाय उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाºया शेतकरी, शेतमजूर, हमाल व मापारी पाल्यासाठी शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.