बाजारात रूईचे दर वाढताहेत; कापसाचे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:20 AM2018-03-29T11:20:40+5:302018-03-29T11:20:49+5:30
सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे.
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे. यामुळेच कापसाला दर मिळत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, कापूस दरवाढीची शेतकऱ्यांची आशा मावळल्याचे चित्र आहे.
अमेरिकेच्या कापूस बाजारात २०१७ साली १ किलो रूईचा भाव १ डॉलर ७९ सेंटच्या आसपास होता. यावेळी देशातील कापूस बाजारात शेतकऱ्यांच्या कापसाला ५,००० ते ५,५०० रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला होता. आज अमेरिकेत रूईचा भाव १ डॉलर ९५ सेंट आहे. म्हणजेच रूईबाजारात तेजी आहे. तरी भारतात शेतकऱ्यांना मिळणारे कापसाचे भाव ४,७०० ते ५,००० रुपये प्रती क्विंटलचेच आहे. चीन, बांग्लादेश, पाकिस्तान मधून भारतीय कापसाची मागणी वाढत आहे. तरी मंदी का? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. यातच बोंडअळीच्या हल्ल्याने कापसाचा दर्जा खालावला असून त्याची मागणी नाही. व्यापाऱ्यांकडून कापसाला दर मिळत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
सध्या कापसाना हमीभावापेक्षा जास्त भाव असल्याने कापूस आयातीकडे कुणाचेही लक्ष नाही. २०१५-१६ साली २२ लाख गाठी, २०१६-१७ साली ३० लाख गाठी आयात झाल्या होत्या. २०१७-१८ साली १७ लाख गाठी आयात होणार आहे. कापसावर आयातकर शून्य असल्यामुळे हा प्रकार घडत आहे.
सरकीच्या दरामुळे आशा मावळली
२०१७ मध्ये सरकीच्या भावात विक्रमी तेजी होती. सरकारचे भाव २,५०० ते २,६०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढले होते. खाद्य तेलाच्या भावात मंदी होती तरी सरकीचे भाव तेजीत होते. त्यावेळी २,३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलचे भाव सरकी ढेपीचे होते.
देशातील रूई बाजारात ३,९०० रुपये ते ४००० रुपये प्रती खंडी रूईचे भाव होते. यावेळी सरकीचे दर २,५०० ते २,६०० रुपये प्रती क्विंटल होते. म्हणूनच कापसाचे भाव ५५०० च्या आसपास होते. आज रूईचे भाव ४,००० रुपये ते ४,२०० रूपये खंडीचे आहेत; पण सरकीचा भाव १,६०० ते १,७०० रूपये प्रती क्विंटलचाच आहे. यामुळे कापसाला दर कमी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
म्हणूनच दर ४,८०० ते ५,००० रुपयांवर
१ क्विंटल कापसापासून ३४ किलो रूई व ६५ किलो सरकी मिळते. १ खंडी रूई म्हणजे १.७० किलो रूईच्या दोन गाठी. म्हणजेच १० क्विंटल कापसापासून १ खंडी रूई व ६.५ क्विंटल सरकी मिळते. म्हणूनच आज कापसाला ४,८०० ते ५,००० रुपये प्रती क्विंटलचे भाव मिळत आहे.
कापसाच्या दराबाबत अनेकांकडून विचारणा होत आहे. प्रारंभी सरकीला दर होता म्हणून कापसाला ५ हजारांच्या वर दर मिळाले. आता पुन्हा सरकीचे दर पडले असल्यामुळे कापसाचे दर कोसळले. यातच यंदाच्या कापसावर आलेल्या शेंदरी बोंडअळीमुळे व्यापाऱ्यांकडून कापसाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांना दर दिला जात नाही.
- विजय जावंधिया, शेतकरी नेते,