आर्वी बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
By admin | Published: April 8, 2017 12:35 AM2017-04-08T00:35:32+5:302017-04-08T00:35:32+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी गत दहा ते बारा दिवसांपासून बंद होती.
शेतकऱ्यांच्या तुरीला ५०० रुपयांनी कमी भाव दिल्याचा आरोप
आर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी गत दहा ते बारा दिवसांपासून बंद होती. ती शुक्रवारी पुन्हा सुरू झाली. यामुळे खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची तूर बाजारात आणली. मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या तुरीला ३५० तर चण्याला ५०० रुपयाने प्रतिक्विंटल कमी भाव देत खरेदी केली. यात व्यापाऱ्यांकडून खुलेआम शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप येथील युवा शेतकरी मनीष उभाड यांनी केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आज दुपारपासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी लिलाव पद्धतीने सुरू केली. यात चना ५०० तर तूर ३५० रुपये कमी भाव देऊन लिलाव बोलल्याने शेतकऱ्यांची एकप्रकारे लूट झाल्याचा आरोप होत आहे. जेव्हा की, आर्वी बाजार समिती सोडून अमरावती व इतर बाजार समितीमध्ये तूर व चणा वाढीव भावाने विकण्यात आले. त्या भावामध्ये ५०० रुपये प्रति क्विंटलची तफावत होती.
सदरची तक्रार करण्याकरिता मनिष उभाड व इतर शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले असता त्या ठिकाणी सचिव व संचालकांपैकी कोणीच उपलब्ध नसल्याने संध्याकाळी संबंधीत तक्रार लेखापालांकडे सोपविण्यात आली.
लेखापाल यांच्याशी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक यांना बोलविण्याचा आग्रह धरला. यावेळी संध्याकाळी ७ वाजता सभापती दिलीप काळे, पोलीस ताफ्यासह बाजार समितीत दाखल झाले.
सभापती सोबत शेतकऱ्यांनी शेतमालाच्या भावाबाबत सविस्तर चर्चा केली असता सभापतींनी संबंधीत सर्व व्यापारी व संचालक मंडळ यांना बोलावून आज घडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या होणाऱ्या लुटीबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले; परंतु यात शेतकऱ्यांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीकरिता आणलेला माल तसाच ठेवलेला आहे. या प्रकरणात शनिवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)