‘सेल्फी’ बेतली जीवावर; धरणातील पाण्यात बुडून विवाहितेचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 05:03 PM2023-01-18T17:03:00+5:302023-01-18T17:03:49+5:30
बोर धरण परिसरातील घटना : सेलू पोलिसांत पतीने दिली तक्रार
हिंगणी (वर्धा) : आजच्या तरुणाईला सेल्फी काढण्याचा मोह जडलेला आहे. रस्त्याकडेला उभे राहून तर कुणी धोकादायक ठिकाणी उभे राहून ‘सेल्फी’ काढत असतात. मात्र, ही ‘सेल्फी’ आपल्या जिवावर बेतू शकते, हे देखील लक्षात घेतले पाहिजे.
अशीच एक धक्कादायक घटना बोरधरण परिसरात घडली. बोर धरणाच्या मुख्य विमोचक ठिकाणाहून सेल्फी घेत असतानाच विवाहितेचा तोल जाऊन ती धरणात पडली. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली अन् तिचा मृतदेहच धरणाच्या काठावर आढळून आला. ही घटना १८ रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली. दिव्या रजत महादुळे (२१, रा. हिंगणी, ह.मु. सेलू) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणी येथील रजत दिलीप महादुळे व त्यांची पत्नी दिव्या हे दोघे १८ रोजी सकाळी बोर धरण येथे फिरायला गेले होते. बोर धरणाच्या मुख्य विमोचक ठिकाणी ते पोहाेचले असता सुमारे तीन फूट उंचीच्या कठड्यावर बसून दिव्या ‘सेल्फी’ घेत होती. विविध प्रकारच्या सेल्फी घेत असतानाच तिचा तोल गेल्याने ती तीन फुटावरून धरणाच्या पाण्यात पडली आणि पुढे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. काही अंतरावर धरणाच्या काठावर दिव्याचा मृतदेह आढळून आला.
याबाबतची माहिती दिव्याचे पती रजत यांनी सेलू पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कोहळे, गजानन मुळे तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आत्राम करीत आहेत.