टॉवरच्या नावाखाली गंडा घालणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:09 PM2018-10-20T22:09:33+5:302018-10-20T22:10:09+5:30
शेतात मोबाईल टॉवर लावून देण्याचे आमीष देऊन सुमारे १०० हून अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली आहे. या ठगबाजांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेसह इतर साहित्य जप्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतात मोबाईल टॉवर लावून देण्याचे आमीष देऊन सुमारे १०० हून अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली आहे. या ठगबाजांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेसह इतर साहित्य जप्त केले आहे. ललित रामकुमार रोहिला (२४), गुरनाम सिंह रमेश कुमार सिंह व रवी धरमसिंग आतरी सर्व राहणार हरियाणा अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रानुसार, कैलास मारोती पिसे (२७) रा. डोगरगांव, ता. समुद्रपूर यांनी पोलिसांकडे आपली काही जणांनी टॉवर लावण्याचे आमिष देऊन फसवणूक केल्याची तक्रार सादर केली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आपल्या तपासाला गती दिली. समुद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. त्यानंतर खात्रिदायक माहितीच्या आधार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणा गाठून सदर तिनही आरोपींना ताब्यात घेतले.
सदर आरोपींना ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांच्या चमुने हरियाणा राज्यातील करनाल येथून काही बँकांमधील सीसीटीव्ही चित्रिकरण प्राप्त केले. शिवाय परिसरातील कॉल सेंटरची माहितीही गोळा केली. पोलिसांच्या सदर चमुने हरियाणा राज्यात काही दिवस राहून आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर ललीत रामकूमार रोहीला, गुरनाम सिंह रमेशकुमार सिंह व रवी धरमसिंग आतरी याला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे गुरनाम हा नागरिकांची फसणूककेल्यानंतर ए.टी.एम. मधून रक्कम काढण्याचे काम करीत होता. सदर तिनही आरोपींपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच मोबाईल, तीन डायरी व रोख रक्कम असा एकूण २६ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, ना.पो.शि. दिनेश बोथकर, अनूप कावळे, प्रदीप वाघ, राकेश आष्टनकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळे, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे, चंद्रकांत जीवतोडे आदींनी केली.