निधी मंजूर होऊनही हुतात्मा स्मारके दुरवस्थेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:54 AM2017-08-09T04:54:01+5:302017-08-09T04:54:01+5:30
दुरवस्था झालेल्या राज्यभरातील हुतात्मा स्मारकांची डागडुजी करण्यासाठी शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी देऊ केला होता. मात्र प्रशासकीय गलथानपणामुळे तो खर्च न होताच परत गेल्याने स्मारके भकासच राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
रूपेश खैरी
वर्धा : दुरवस्था झालेल्या राज्यभरातील हुतात्मा स्मारकांची डागडुजी करण्यासाठी शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी देऊ केला होता. मात्र प्रशासकीय गलथानपणामुळे तो खर्च न होताच परत गेल्याने स्मारके भकासच राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी राज्यभरात एकूण २०६ स्मारके उभारण्यात आली. या स्मारकांची डागडुजी आणि अन्य कामांसाठी २५ कोटी रुपये जाहीर करून जिल्हानिहाय रक्कम रवाना करण्यात आली होती. प्रत्येक स्मारकासाठी ९ लाख ७१ हजार रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली होती. कमी निधीची आवश्यकता असेल, तर उर्वरित निधी दुसºया स्मारकासाठी वापरण्याच्या सूचना होत्या. तसेच शिल्लक रक्कम अन्य कामांवर खर्च न करता नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शासनाकडे जमा करण्याचा आदेश होता. प्रत्यक्षात निधी वापरलाच न गेल्या पुन्हा शासनाकडे जमा झाला.
शासनाकडून निधी उशिरा आल्यामुळे कामे होण्यापूर्वीच मार्च अखेरीस तो परत गेला. यामुळे जिल्ह्यात स्मारकाची दुरूस्ती झाली नाही.
- मंगेश जोशी,
निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.