अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार
By admin | Published: July 17, 2015 02:13 AM2015-07-17T02:13:27+5:302015-07-17T02:13:27+5:30
रस्त्याने जात असलेल्या युवतीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना विजयगोपाल येथे गुरुवारी उघड झाली.
युवती रुग्णालयात : पुलगाव पोलिसात गुन्ह्याची नोंद
विजयगोपाल : रस्त्याने जात असलेल्या युवतीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना विजयगोपाल येथे गुरुवारी उघड झाली. यात सदर मुलीची प्रकृती खालावल्याने तिला भिडीच्या आरोग्य केंद्राच्या बाहेर सोडण्यात आले. या प्रकरणी पुलगाव पोलिसांत आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून दुचाकीसह दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणातील पीडित युवती बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घरून मलातपूर येथे जाण्याकरिता निघाली. दरम्यान तिच्या ओळखीचे दोन युवक भेटले. त्यांच्या दुचाकीवर बसून ती गेली. या दोघांनी तिला दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर आळीपाळीने अतिप्रसंग केला. यात तिची प्रकृती खालावल्याने दोघांनाही तिला दुचाकीवर आणत रात्री १० वाजताच्या सुमारास भिडी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सोडून ते पसार झाल्याचे युवतीने पोलिसांना सांगितले.
घरुन गेलेली मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या आईने सर्वत्र शोधाशोध सुरू केला. त्याचवेळेस त्या मुलीच्या आईची मानसिक धक्काने प्रकृती खालावल्याने तिला विजयगोपाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून तिला भिडी येथे हलविण्यात आले. सदर युवती भिडी रुग्णालयात असल्याचे तिच्या नातलगांना दिसून आले. तिलाही येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मुलीची प्रकृती खालावत असल्याने देवळी पोलिसांनी रात्री १२ वाजता भिडी येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत या प्रकरणात कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हे विशेष. या गुन्ह्याचे घटनास्थळ देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने देवळी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. देवळी पोलिसांनी झिरोचा गुन्हा नोंद करून प्रकरण पुलगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या दोन युवकांना पुलगाव पोलिसांनी संशयित म्हणून घटनेतील दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. वृत्तलिहिपर्यंत त्यांना आरोपी म्हणून अटक केलेली नव्हती. याचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहे.(वार्ताहर)
आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणात पुलगाव पोलिसात ३६३, ३६६, ३७६/२, ग, ५०६, १३२/१५, ६९ ग, बाल अत्याचार कायदा २०१२ यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना अटक दाखविण्यात आली नाही. पोलीस पुन्हा कशाची चौकशी करणार आहे, याबाबत समजू शकले नाही.