मावा, पांढरी माशी व मिलिबगचा हल्ला
By admin | Published: September 12, 2016 12:45 AM2016-09-12T00:45:18+5:302016-09-12T00:45:18+5:30
पिकांना गरज असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे पिकांवर अनेक किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे.
पावसाची प्रतीक्षा संपता संपेना : कपाशी धोक्यात; रस शोषणाऱ्या किडींमुळे वाढ खुंटली
वर्धा : पिकांना गरज असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे पिकांवर अनेक किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे. सोयाबीन हातचे गेल्याची स्थिती असताना कपाशीवर मावा तुडतुडे, पांढरी माशी व मिलिबगने एकत्रीत हल्ला चढविल्याने कपाशीचे उत्पन्नही हातचे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे यंदाही शेतकऱ्याला निसर्र्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागणार असल्याचे वास्तव जिल्ह्यात निमाण झाले आहे.
प्रारंभी मारलेली दडी व नंतर लागून पडलेला पाऊस यामुळे पेरणीला विलंब झाला. यात साधलेल्या पेरणीतून उत्पन्नाची आशा असतानाच नेमक्या वेळी पुन्हा पावसाने दडी मारली आहे. गत महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे. कपाशीवर एकाच वेळी मावा तुडतुडे, पांढरी माशी व मिलिबगचा हल्ला होत असल्याने कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. ही कीड झाडातील रस शोषत असल्याने कपाशीच्या झाडांचे शेंडे वाकत आहेत. परिणामी झाडांची वाढ खुंटत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास कपाशीवर या तीन किडींसह चुरडाही येण्याची शक्यता बळावली आहे. चुरड्यामुळे फूल व बोंडावर विपरित परिणाम होवून उत्पन्नात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
हा सर्व प्रकार पावसाच्या दडीने होत असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगत आहेत. यावर उपाय म्हणून आंतर प्रवाही कीड नाशकाची फवारणी करावी असा सल्ला देण्यात आला आहे; मात्र जोपर्यत पिकांकरिता दमदार पाऊस येणार नाही तोपर्यंत पीक तग धरणार नसल्याचे बोलले जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी ओलीत करणे सुरू केले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही त्यांची अडचण होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्यांच्या आशा आता आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.(प्रतिनिधी)
येत्या दिवसांत फूल किडींची शक्यता
सध्या कपाशीवर एकाचवेळी तीन किडींनी हल्ला चढविला आहे. यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. हा सर्व प्रकार पावसाच्या दडीमुळे होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. या किडींवर उपाय योजना आखणे सुरू आहे, पण त्याचा विशेष परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. ही स्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसांत कपाशीवर फूल खाणाऱ्या किडीचा प्रादूर्भावही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या किडीमुळे कपाशीच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.
बळीराजाच्या आभाळाकडे नजरा
पिकांची होत असलेली दैना केवळ पावसाच्या दडीमुळे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाशात अनेक दिवसांपासून ढग कायम असले तरी पावसाचा थेंब पडायला तयार नाही. पीक वाचविण्याकरिता पावसाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.पावसाशिवाय काहीच पर्याय नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.