मायेच्या कोपऱ्यातून एक हजारांवर गरजूंना मिळाली ‘मायेची शिदोरी’
By admin | Published: April 17, 2017 12:39 AM2017-04-17T00:39:20+5:302017-04-17T00:39:20+5:30
शहराच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामानिमित्त गावखेड्यातून दररोज असंख्य लोक येतात. यामध्ये अनेकांची आर्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे
दोन घास पोटासाठी : शहरात कामानिमित्त येणाऱ्यांना दिलासा; अनेक दानदात्यांकडून आधार
प्रशांत हेलोंडे वर्धा
शहराच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामानिमित्त गावखेड्यातून दररोज असंख्य लोक येतात. यामध्ये अनेकांची आर्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे ते पोटाला चिमटा देत दिवसभर आपली कामे करतात. काम झाले तर चेहऱ्यावर आनंद आणि नाही झाले, तर निराश होऊन परत जातात. दरम्यान, खिशात जेमतेच दमडी असल्यामुळे नाश्ता, तर दूरच चहासुद्धा विकत घेऊ शकत नाही, अशा गरजूंसाठी शहरातील डॉक्टर मंडळींनी ‘मायेचा कोपरा/मायेची शिदोरी’ हा उपक्रम सुरू करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. गत दोन महिन्यांत या उपक्रमामुळे तब्बल एक हजारावर लोेकांच्या पोटात अन्नाचे दोन घास पडले. यामुळे त्यांचे काम झाले नाही तरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाने भाव बघायला मिळत आहे.
वैद्यकीय जनजागृती मंच या वर्धा शहरातील डॉक्टरांच्या संघटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयातून मायेचा कोपरा या नावाने मायेची शिदोरी या उपक्रमाला प्रारंभ झाला. येथे येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या मायेच्या शिदोरीने चांगलाच दिलासा मिळाला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम सुरू झाला. त्यांना हा उपक्रम भावुक करणारा ठरला. यानंतर त्यांनी शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी विविधा केंद्रात हा उपक्रम सुरु केला. मात्र येथील जबाबदारी संबंधितांनी बरोबर पार न पाडल्यामुळे काही अंतरावरील गांधी चौकातील पांगुळ कॅन्टीनवर ही जबाबदारी सोपविली. या उपक्रमाचे महत्त्व वाढत गेले. आजघडीला तब्बल नऊ ठिकाणी मायेचा कोपरा कामानिमित्त आलेल्या गरीबांची भूक क्षमविणारी शिदोरी देत आहे. मागील दोन महिन्यात तब्बल एका हजारांवर गरजूंनी या शिदोरीचा आस्वाद घेतला. सामान्य रुग्णालयातील केंद्रातून ७७२ जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
उपक्रमाला २२ संघटनांचा हातभार
वैद्यकीय जनजागृती मंचने सुरू केलेल्या या उपक्रमाला आता तब्बल शहरातील जिल्हा प्रशासनासह तबल २२ सामाजिक संघटना आणि सामाजिक दायित्त्वाचा भाग म्हणून काही दानशूरही हातभार लावत असल्याचे दिसते आहे. ही मंडळी दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करुन हा उपक्रम सुरळीत चालवित आहे. ही सहकार्यासाठी पुढे येणाऱ्या संघटनांची संख्या वाढीवर आहे.
स्वाभिमानाची शिदोरी
शहरात ‘मायेचा कोपरा’ या नावाने गरीबांना मायेची शिदोरी उपलब्ध करुन दिली जात आहे. ही शिदोरी देण्याचे प्रयोजन होते. मात्र समाजात गरीबी असली तरी ते स्वाभीमानाने जगतात. त्यांना फुकट घेण्यास ते कचरतात. असा अनुभव काही केंद्रावर आला. एका दाम्पत्याने फुकट कुपण घेण्यास नकार दिला. तेव्हापासून गरीबांचा स्वाभीमान जपण्यासाठी पाच रुपयात हे कुपण उपलब्ध करुन दिले जात आहे.