‘मायेची शिदोरी’मध्ये गरजूंना पाच रुपयांत जेवण
By admin | Published: January 16, 2017 12:41 AM2017-01-16T00:41:07+5:302017-01-16T00:41:07+5:30
अनेक गरजुंना दोन घास अन्नासाठी वणवण भटकावे लागते. रुग्णांसोबत वा कामानिमित्त वर्धा सारख्या शहरात
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ : विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रम
वर्धा : अनेक गरजुंना दोन घास अन्नासाठी वणवण भटकावे लागते. रुग्णांसोबत वा कामानिमित्त वर्धा सारख्या शहरात येणाऱ्यांना अल्पोपहार वा पाण्यावर दिवस काढावा लागतो. या गरजुंना आता केवळ पाच रुपयांत भरपेट जेवण मिळेल. यासाठी ‘मायेचा कोपरा’ अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय जनजागृती मंचाच्या पुढाकाराने ‘मायेची शिदोरी’ हा उपक्रम शासकीय कार्यालये व सामाजिक संघटनांनी सुरू केला. रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील काही शासकीय कार्यालये तथा सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन सामान्य रुग्णालयात वैद्यकीय जनजागृती मंचाच्या पुढाकाराने ‘मायेचा कोपरा’ सुरू केला. तेथे गरजूंकरिता कापड, चप्पल, जोडे आदी साहित्य उपलब्ध करण्यात आले. त्याचा अनेक गरजुंनी लाभ घेण्यास सुरुवात केली. यात पुढचे एक सेवाभावी पाऊल उचलत ‘मायेची शिदोरी’ हा उपक्रमही सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पाच रुपयांच्या ‘कुपण’वर पोटभर जेवण दिले जाणार आहे. शुभारंभप्रसंगी रविवारी काही गरजुंना भोजनदान करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वर्धा सोशल फोरमचे अभ्यूदय मेघे, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, सतीश बावसे यांच्यासह उपक्रमात सहभागी कार्यालयांचे प्रमुख, संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
उपक्रमात २१ संस्थांचा सहभाग
जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य रुग्णालय, वैद्यकीय जनजागृती मंच, रोटरी क्लब, जनहित मंच, आगाज युवा बहुउद्देशीय संस्था, श्रमिक पत्रकार संघ, वर्धा सोशल फोरम, नॅशनल युथ युनियन आॅफ इंडिया, लॉयन्स क्लब, युवा महाशक्ती, वीर भगतसिंग ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलू, शिवगर्जना ढोल-ताशा पथक, वर्धा हॉटेल्स असोसिएशन, माहेश्वरी नवयुवक मंडळ, आधारवड, भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र स्टेट मेडिकल रिपे्रझेंटेटीव्ह असोसिएशन, वर्धा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन व अरहम आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
येथे मिळतील कुपण
या सेवेचा लाभ घेण्यासाठी पाच रुपयांचे कुपण दिले जाणार आहे. सामान्य रुग्णालय तथा जिल्हाधिकारी कार्यालयातील विविधा सेतू केंद्रात मायेची शिदोरीचे कुपण गरजूंना मिळेल.