वर्ध्यातील कुख्यात पांडे ‘गॅंग’वर ‘मोक्का’; सातही गुन्हेगारांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी
By चैतन्य जोशी | Published: March 15, 2023 07:17 PM2023-03-15T19:17:26+5:302023-03-15T19:19:24+5:30
शहरातील स्टेशनफैल परिसरात राकेश पांडे गट आणि आदिल शेख गटातील गुन्हेगारांमध्ये चांगलाच राडा झाला होता.
वर्धा : शहरात मागील काही वर्षांपासून ‘गॅंगवॉर’ उफाळत चालला होता. गुन्हेगारी टोळ्या आमने-सामने येऊन सशस्त्र हाणामारीच्या घटना घडत होत्या. नुकत्याच स्टेशनफैल परिसरात दोन गटात झालेल्या ‘फायरिंग’ प्रकरणातील कुख्यात असलेल्या पांडे गटातील राकेश पांडेसह सहा गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
राकेश मुन्ना पांडे, गणेश श्याम पेंदोर, विकास सूरज पांडे, शेख समीर अब्दुल रहीम उर्फ समीर दालगरम, राहुल रमेश मडावी, मिथुन भागवत उईके, प्रज्वल दिनेश पाझारे सर्व रा. इतवारा यांना मोक्का कायद्यांतर्गत अटक करुन मोक्का न्यायालयात हजर केले असता २३ रोजीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
शहरातील स्टेशनफैल परिसरात राकेश पांडे गट आणि आदिल शेख गटातील गुन्हेगारांमध्ये चांगलाच राडा झाला होता. याप्रकरणात फायरिंग देखील झाली होती. पोलिसांनी पांडे गटातील सर्वच आरोपींना ४८ तासांत अटकही केली. वारंवार संघटीत गुन्हेगारी फोफावत असल्याने पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी गांभीर्याने लक्ष देत राकेश पांडे गटातील सहा गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन १९९९ चे कलम समाविष्ट करुन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी १३ रोजी मंजूरी दिली. १४ राेजी गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे यांच्याकडे हस्तांतरित केला. सर्व कुख्यात आरोपींना १५ रोजी ताब्यात घेत वर्ध्यात २०२१ मध्ये स्थापना झालेल्या विशेष मोक्का न्यायालयात हजर करुन २३ मार्च रोजीपर्यंत पोलिस कोठडी प्राप्त केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, सत्यजीत आमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी, पोलिस उपनिरीक्षक पाटील, संजय खल्लारकर, अनुप राऊत, रवींद्र नरुले, गणेश आत्राम यांनी केली.