दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात उपाययोजनांचा दुष्काळ
By admin | Published: May 25, 2017 01:06 AM2017-05-25T01:06:59+5:302017-05-25T01:06:59+5:30
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी झोन निर्माण करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात विक्री जोरात : कारवाई करणारेही घेतात बघ्याची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी झोन निर्माण करण्यात आला आहे. मात्र, अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या उपाययोजनांचा दुष्काळ दारूबंदीच्या जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लहान गावातही अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. लग्नसराईचा मोसम सध्या सुरू असल्याने दारूची विक्रीही मुबलक प्रमाणात वाढली आहे.
राज्यात सर्वात प्रथम वर्धा जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यानंतर १९९२ मध्ये गडचिरोली जिल्हा दारूबंदी करण्यात आला. १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करताना वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या दोन जिल्ह्यात अंमलबजावणीत राहिलेल्या उणीवा शोधण्यात आल्या व त्यावर उपाय योजना करून चंद्रपूरच्या दारूबंदीला मुहूर्तरूप देण्यात आले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने या तिन जिल्ह्याच्या दारूबंदी झोनसाठी फारशा उपाययोजना केल्या नाहीत. दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या सिमेपासून २५ कि.मी. अंतरावरचे दुकान बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांची पूर्तता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही प्रमाणात झाली; पण आता पुन्हा रस्त्याचे मालकी हक्क बदलवून हे दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच दारूबंदीच्या जिल्ह्यात फिरत्या प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी सुरू केल्या जाणार होत्या. केवळ चंद्रपूर जिल्ह्यात अशी प्रयोगशाळा निर्माण केली जात आहे. वर्धा व गडचिरोली जिल्ह्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करून सरकारजमा करण्याची कारवाई गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आली. मात्र, वर्धेत अशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. प्रत्येक गावात दारूबंदीच्या विरूद्ध कमेटी तयार करण्याच्या शासन निर्णयावर ही अंमलबजावणी संथगतीने सुरू आहे. एकूणच अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभाग कमी पडत आहे.
गांधी विनोबांच्या गावातही दारूचा महापूर
महात्मा गांधी याची कर्मभूमी असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू उपलब्ध होत आहे. अनेक ठिकाणी दारूच्या शिश्या पडलेल्या दिसून येत आहे. तसेच वर्धा शहरातही अनेक शासकीय कार्यालय परिसरात दारूच्या बॉटलचा खच पडलेला दिसून येतो. विनोबा भावे यांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पवनार गावात नदीच्या किनाऱ्यावरच गावठी दारूच्या भट्या सुरू आहेत. त्यामुळे पवनार हे गाव गावठी दारू विक्रीचे मुख्य केंद्र झाले आहे.