निगेटिव्ह अहवालाकरिता यंत्रणा पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:11+5:30
कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असतानाच जिल्हा प्रशासनाने त्यावर मात करण्याकरिता अॅक्शन मोडवर कार्य सुरु केले आहे. परिणामी अद्यापही जिल्ह्यात एकही कोरानाबाधीत रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, जिल्हा परिषद, पालिका प्रशासन दिवसरात्री खाद्याला खांदा लावून कार्यरत आहे. या सर्वांच्या समन्वयापुढे कोरोना विषाणूची ताकद सध्यातरी निगेटिव्ह झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू राज्यभरात दिवसेंदिवस आपले पाय पसरवित आहे. रुग्णांची संख्याही वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये या आजाराबाबत चांगलीच धास्ती भरली आहे. साधा ताप, खोकला आला तरीही मनामध्ये अनेक प्रश्न घोंगावतात. हा आजार मला तर होणार नाही ना, सोशल डिस्टन्सिग म्हणजे नेमके, आयसोलेशन, होम क्वारंटाईन म्हणजे काय अशा नानाविध प्रश्नांनी सर्वसामान्यांच्या मनात काहूर उठविला आहे. त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होत असल्याने त्यांचे मनोबल वाढविण्यासोबतच जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित राहू नये याकरिता जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच पॉझिटिव्ह प्रयत्न चालविले आहे.
कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असतानाच जिल्हा प्रशासनाने त्यावर मात करण्याकरिता अॅक्शन मोडवर कार्य सुरु केले आहे. परिणामी अद्यापही जिल्ह्यात एकही कोरानाबाधीत रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, जिल्हा परिषद, पालिका प्रशासन दिवसरात्री खाद्याला खांदा लावून कार्यरत आहे. या सर्वांच्या समन्वयापुढे कोरोना विषाणूची ताकद सध्यातरी निगेटिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. या आजाराला रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनचा आदेश दिला होता. त्यानंतर लगेच पंतप्रधानांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली. परिणामी सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्याने व्यवहारही ठप्प झाले. यादरम्यान जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली. यात प्रशासनाकडून वेळा ठरवून देण्यात आल्या. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिग आणि विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही दुकानमालकांना देण्यात आल्या आहे. रस्त्यावरची वर्दळ रोखण्याकरिता पोलीस बंदोबस्तही ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. तरीही काहींनी या नियमाला फाटा देण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांच्या दंडुक्याला तसेच प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या पॉझिटिव्ह कार्यपद्धतीने जिल्ह्यात कोरोनाही पाय ठेवण्यास घाबरत आहे पण, त्याला नागरिकांच्या सहकार्याचीही तेवढीच गरज आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात साडेदहा हजार नागरिकांची घरवापसी
नोकरी व शिक्षणाकरिता घरापासून लांब गेलेले व्यक्ती या कोरोनाच्या प्रादुर्भावाने आपल्या घरी परतले आहे. विदेशासह पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यातून तब्बल १० हजार ५८० व्यक्ती विविध तालुक्यामध्ये परत आले आहे. यात विदेशातून ११४ व्यक्ती मायदेशी आले आहे. आता यातील काही होम क्वारंटाईन असून काहींनी १४ दिवसाचा कालावधी पूर्ण केला आहे. आता या सर्व मंडळींना लॉकडाऊनपर्यत तरी आपल्याच घरी आपल्या परिवारासह वेळ घालवावा लागणार आहे.
अहवाल प्राप्त, बाधित रुग्ण नाहीच, आॅप्टीकलची दुकानेही राहणार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत विदेशासह पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून १० हजार ५८० व्यक्ती आले आहेत. त्यातील ५१ व्यक्तींच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ४० चाचणी अहवाल प्राप्त झाले असून ते सर्वच निगेटिव्ह आले आहे. अद्याप ११ चाचणी अहवाल प्रलंबित आहे. सध्यास्थितीत सहा व्यक्ती गृह विलगिरणात असून आज गुरुवारी ४ व्यक्ती गृह विलगिकरणातून बाहेर काढण्यात आल्या. आतापर्यंत १०८ व्यक्ती गृह विलगीकरणातून बाहेर आल्या आहेत. तसेच आज ११ व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. अद्यापही जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढलेला नाही, हे विशेष.
नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी प्रत्येक सोमवारी व मंगळवारी जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल मेंटेनन्स अॅण्ड इलेक्ट्रिकल स्पेअर्स साहित्याची दुकाने व आॅटोमोबाईल मेंटेनन्स अॅण्ड आॅटोमोबाईल स्पेअर पार्टस, एसेसरीज व दुरुस्तीचे दुकान सुरु ठेवण्याचा आदेश दिला होता. तो आदेश रद्द करुन प्रत्येक बुधवारी इलेक्ट्रिकल मेंटेनन्स अॅण्ड इलेक्ट्रिकल स्पेअर्स साहित्याची दुकाने तर प्रत्येक शनिवारी चष्म्याचे (आॅप्टीकल) दुकाने सुरु ठेवण्याचा सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आला आहे.