वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांत वाद
By Admin | Published: July 3, 2016 02:12 AM2016-07-03T02:12:05+5:302016-07-03T02:12:05+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कार्यरत एका परिचारिकेला वैद्यकीय अधिकारी अर्वाच्च भाषेत बोलल्याचा आरोप करीत...
प्रकरण पोलिसांत : शिवीगाळ केल्याचा आरोप
वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कार्यरत एका परिचारिकेला वैद्यकीय अधिकारी अर्वाच्च भाषेत बोलल्याचा आरोप करीत सकाळी परिचारिकांनी काम बंद आंदोलन केले. यात जिल्हा शल्य चिकित्सकांनी मध्यस्थी केल्यानंतर परिचारिका कामावर परतल्या. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
या प्रकरणी सदर परिचारिकेने या वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. सामान्य रुग्णालयाद्वारे समिती गठित करून चौकशी सुरू केल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, सामान्य रुग्णालयात रात्र पाळीत कार्यरत डॉ. स्वप्नील बेले यांनी यावेळी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला एका रुग्णाच्या रक्त व लघवीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना केल्या. त्या नमून्याच्या अहवालावरून डॉ. बेले व परिचारिकेत हमरीतुमरी झाली. यात अधिकाऱ्याने मारहाण करण्याची भाषा बोलल्याचा आरोप परिचारिकेने केला. सकाळी याची परिचारिकांच्या संघटनांना माहिती होताच त्यांनी कामबंद आंदोलन केले. ही बाब कळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. निवृत्ती राठोड यांनी रुग्णालय गाठत माहिती घेतली व परिचारिका संघटनांशी चर्चा केली. एक समिती गठित करून चौकशी केली जाईल, असे सांगितले. यावर संघटनांनी आंदोलन मागे घेतल्याचे रुग्णालयाद्वारे सांगण्यात आले. असे असले तरी परिचारिकेने डॉ. बेले विरूद्ध शहर ठाण्यात तक्रार केली. यात वैद्यकीय अधिकाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली. यावरून डॉ. बेले यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ५०६ व अॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
सदर प्रकरणाची माहिती मिळाली. याची चौकशी करण्याकरिता एक तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कारवाई करण्यात येईल. यात कुणालाही समर्थन देण्यात येणार नाही. याबाबत परिचारिकांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनी संप मागे घेतला. रुग्णांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.