कौमार्य चाचणी अवैज्ञानिकच; डॉक्टर न्यायालयाला पटवून देणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 11:19 AM2022-07-09T11:19:32+5:302022-07-09T11:36:54+5:30
तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रथमच हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
वर्धा : देशातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना कौमार्य चाचणी व त्याची लक्षणे कशी अवैज्ञानिक, अमानवीय आणि भेदभावपूर्ण आहेत हे शिकवण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) घेतला आहे. तसेच विवाह रद्द करणे आणि नपुंसकत्व यासारख्या वैवाहिक विवादांमध्ये न्यायालयाने कौमार्य चाचणी करण्याचे आदेश दिल्यास, ती चाचणी अवैज्ञानिक कशी आहे, हे न्यायालयाला डॉक्टरांनी कसे समजावून सांगावे याबद्दलसुद्धा विद्यार्थ्यांना न्यायवैद्यकशास्त्र या विषयात शिकविण्याचा ऐतिहासिक निर्णय आयोगाने घेतला आहे.
देशभरातील कौटुंबिक न्यायालये आणि उच्च न्यायालये नपुंसकत्व, विवाह रद्द करणे आदी वैवाहिक विवादांच्या प्रकरणांमध्ये महिला कुमारी आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी कौमार्य चाचणी घेण्याचे निर्देश डॉक्टरांना, तसेच वैद्यकीय मंडळांना देत असतात. मद्रास उच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमातील समलिंगी, ट्रान्सजेंडर इत्यादी समुदायासंबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैद्यकीय आयोगाच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा अरुणा वाणीकर यांनी तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये दिल्लीचे डॉ. विजेंद्र कुमार, सायकियार्टी विभाग बंगलोरच्या डॉ. प्रभा चंद्रा, एम्स गोरखपूरच्या डॉ. सुरेखा किशोर आणि सेवाग्रामचे न्यायवैद्यकशास्त्रतज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांचा समावेश होता. डॉ. इंद्रजित खांडेकर यांच्या विनंतीवरून कौमार्य विषयसुद्धा समितीच्या कार्यकक्षेत टाकण्यात आला होता. तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रथमच हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
न्यायदानात गफलत होऊ नये म्हणून....
जेव्हा जेव्हा न्यायालय डॉक्टरांना कौमार्य चाचणी करण्याचे आदेश देतात तेव्हा डॉक्टर मुलींच्या हायमेनची (कौमार्य पटल) जखम, रक्तस्राव, त्याच्या छिद्राचा आकार, तसेच योनीमार्गाची शिथिलता याची तपासणी करतात. या सर्व तपासणीला कौमार्य चाचणी असे म्हटले जाते. या सर्व तथाकथित कौमार्य तपासणीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असे न्यायालयांना कसे समजावून सांगावे हे सध्या डॉक्टरांना शिकवले जात नाही. म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार डॉक्टर अशा तपासण्या करतात. त्यामुळे न्यायदानाची गफलत होत राहते. त्यामुळे आता वैद्यकीय विद्यार्थ्यांना ते अवैज्ञानिक कसे, हे समजावून सांगण्याचे कौशल्य शिकविण्याचा निर्णय घेतला आहे.
बरीच भारतीय न्यायालये कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे, याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे जर न्यायालयाने एखादी अवैज्ञानिक चाचणी करण्याचे आदेश डॉक्टरांना दिल्यास ती चाचणी कशी अवैज्ञानिक आहे, हे न्यायालयांना समजावून सांगण्याचे कौशल्य वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केले जाण्याची वैद्यकीय शिक्षणाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, तसेच हेही समजून घेणे महत्त्वाचे आहे की दुसरी व्यक्ती कुमारी आहे की नाही, हे जाणून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.
- डॉ. इंद्रजित खांडेकर, न्यायवैद्यकशास्त्रतज्ज्ञ, सेवाग्राम