महत्त्वाकांक्षी अमृत योजनेची सभा तहकूब
By admin | Published: September 9, 2016 02:12 AM2016-09-09T02:12:59+5:302016-09-09T02:12:59+5:30
अमृत योजनेसाठी (२४ तास पाणीपुरवठा) केंद्र व राज्य शासनाने वर्धा व उस्मानाबाद नगर परिषदेला मंजुरी दिली.
पालिकेतील प्रकार : १२ सदस्यांची उपस्थिती
वर्धा : अमृत योजनेसाठी (२४ तास पाणीपुरवठा) केंद्र व राज्य शासनाने वर्धा व उस्मानाबाद नगर परिषदेला मंजुरी दिली. याच विषयावर स्थानिक नगर पालिकेमध्ये गुरूवारी विशेष सभा बोलविण्यात आली होती; पण ३९ पैकी केवळ बाराच सदस्य उपस्थित होते. परिणामी, महत्त्वाकांक्षी योजनेवर चर्चेसाठी असलेली सभा कोरमअभावी तहकूब करावी लागली. ही सभा आता १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील ११३ किमी पाईप लाईन, पुलफैल भागात २ लाख लिटर क्षमतेची टाकी, पवनार पम्पिंग सेंटरला ५ कोटी ५० लाख रुपयांची मशीन, पाण्याचे आॅडीट करून सॅटेलाईटद्वारे अवैध पाईपलाईन व नळ जोडण्यांचे निरीक्षण, एडीसीसी कंपनीद्वारे सुजल निर्माण योजनेंतर्गत अवैध पाणी व पाणीटंचाईचे सॅटेलाईटद्वारे निरीक्षण पूर्ण झाले. या योजनेत केंद्राचे ५० टक्के, राज्य शासनाचे ४० टक्के व १० टक्के नगर परिषदेचा वाटा आहे. याबाबत मुंबई, नागपूर व वर्धा येथील अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. कायदेशीर व तांत्रिक उणिवा दूर केल्यानंतर सात कंत्राटदारांनी ई-टेंडरद्वारे निवीदा भरल्या. यातील सहा निविदा मंजूर झाल्या. पैकी ए.डी.एफ. कंपनीची १७.७९ कोटी दराची निविदा पालिकेच्या विशेष सभेत चर्चेला येणार होती. नगर सेवकांना चर्चा करून ती मंजूर करीत नगर विकास विभागाला ९ सप्टेंबर रोजी सादर करायची होती. राज्य शासनाने न.प. मुख्याधिकाऱ्यांना १५ दिवसांपूर्वी यासाठी सुचित केले. मुख्याधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर अध्यक्षांनी गुरूवारी विशेष सभा घेण्याबाबत रविवारी सूचित केले.
मुख्याधिकारी व पाणी पुरवठा उपसंचालक नागपूर व वर्धा, जीवन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांनी तपासणी करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. हा विषय विशेष सभेत न.प. सदस्यांसमोर ठेवण्यात आला. सभागृहात कोरमसाठी २० सदस्य उपस्थित असणे गरजेचे होते; पण भाजपाचे आठ व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षासह चार सदस्य उपस्थित होते. यामुळे अतिमहत्त्वाच्या विषयावरील सभा तहकूब करावी लागली. सभेला नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया, पाणी पुरवठा सभापती शुभांगी कोलते, न.प. सदस्य माया उमाटे, जगदीश टावरी, दीपिका आडेपवार, रमन लालवानी, प्रशांत बुर्ले, राखी पांडे, लता जैन, सिद्धार्थ बुटले, बंटी गोसावी आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)