शेतकरी हक्क परिषदेसाठी सभा
By admin | Published: April 13, 2017 01:47 AM2017-04-13T01:47:00+5:302017-04-13T01:47:00+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी
वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी शेतकरी हक्क परिषद घेण्यात येत आहे. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने १६ एप्रिल ला लोक महाविद्यालय, वर्धा येथे दुपारी १२ वाजता आयोजित या परिषदेची माहिती देण्यासाठी विश्रामभवन येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.
यावेळी विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, अॅड. महेंद्र धोटे, निळकंठ राऊत, रामराव मुडे, वसंता मुजबैले, हेमकांत वरटकर, समीर महाकाळकर, अरविंद थूल, पांडूरंग येळणे, डॉ. राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
घाम व रक्त गाळून पिकविलेल्या शेतमालाला भाव नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर घेवून, शेतकरी व त्याची तरणीताठी पोरं आत्महत्या करीत आहे. विद्यमान सरकार कुणालाही न जुमानता शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व नवनगर निर्मितीच्या नावावर लँडपूलींग करुन फुकटात जमिनी हडपत आहे. या सरकारच्या काळात दोन वर्षात आजपर्यंत ९ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरी मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास नकार देत आहे, त्यामुळे ही परिषद घेण्यात येणार असून या समस्यांना वाचा फोडायची आहे, अशी माहिती प्रा. गमे, अॅड. धोटे यांनी दिली.
महात्मा फुले समता परिषदेच्या या शेतकरी हक्क परिषदेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे दीड भावाचा किमान हमीभावाचा कायदा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूमी संपादनत शासनाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. सभेला प्रवीण धलवार, अशोक येंगडे, राजेंद्र ठोंबरे, इंद्रपाल गायकवाड आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)