बैठकी, आंदोलने उदंड झाली; आमच्या समस्या सुटणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 05:00 AM2022-04-14T05:00:00+5:302022-04-14T05:00:21+5:30
बिंदुनामावलीनुसार एलएचव्हीच्या प्रशिक्षणाकरिता आरोग्य सेविकांना प्राधान्य देऊन प्रशिक्षणास पाठविण्यात यावे. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकी त्वरित देण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ येथील अंशदायी योजनेतील कपात केलेल्या रकमेत अफरातफर झाली असून याबाबत चौकशी करण्यात आली.
वर्धा : कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र कर्तव्य बजावले. परंतु, या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्याकडे कुणाचेही लक्ष नाही. आतापर्यंत या प्रलंबित मागण्यांकरिता अनेक बैठकी आणि आंदोलने झालीत. परंतु, समस्या सुटल्या नसल्याने कर्मचारी संघटनेकडून संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या कधी निकाली काढणार, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना उईके व जिल्हा सचिव दीपक कांबळे यांची उपस्थिती होती. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अनेकदा बैठका झाल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांचे १०, २० व ३० कालबद्ध पदोन्नती, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक (महिला व पुरुष) यांची रिक्तपदी पदोन्नती, गौळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये अफरातफर, कोविड लसीकरणासाठी मोबाईल इंटरनेट, लस टोचक व ऑपरेटर यांना ५०० रुपये, ती वाहकाला मिळणारा २०० रुपये भत्ता, लेखाशीर्ष २२११ च्या पदाची बिंदुनामावली करणे, आदी मागण्यांकडे लक्ष वेधून त्या सोडविण्याची विनंती करण्यात आली. बऱ्याचदा निवेदन आणि आंदोलनेही केली. परंतु, कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली, असे मत यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांच्याकडे बोलून दाखविले. तेव्हा या प्रलंबित मागण्या लवकरच निकाली काढणार, असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांनी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
प्रलंबित मागण्यासंदर्भात आजपर्यंत कुठलाही निर्णय नाही
- बिंदुनामावलीनुसार एलएचव्हीच्या प्रशिक्षणाकरिता आरोग्य सेविकांना प्राधान्य देऊन प्रशिक्षणास पाठविण्यात यावे. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकी त्वरित देण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ येथील अंशदायी योजनेतील कपात केलेल्या रकमेत अफरातफर झाली असून याबाबत चौकशी करण्यात आली. परंतु, बाधित कर्मचाऱ्यांना रक्कम परत मिळाली नसल्याने ती परत करावी तसेच बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित करा, आदी मागण्यांसदर्भात बैठकीत चर्चा केली असून, यातील एकही मागणी आजपर्यंत पूर्णत्वास गेली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला संघटनेचे बाबाराव कनेर, वंदना उईके, रतन बेंडे, शालू कौरती, उमा चौधारी, तृप्ती देशमुख, विकास माणिककुडे, शरद डांगरे, नीलेश साटोणे, दिलीप धुडे, भीमराव खुडे, किरण वाटकर आणि प्रशासनाच्या सहायक प्रशासन अधिकारी नरेंद्र पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नीलेश चव्हाण, शाईस्ता शाह यांची उपस्थिती होती.
...तर आंदोलनातून निषेध नोंदविणार!
- आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेक बैठका झाल्या, निवेदने दिली; पण समस्या जैसे थेच आहे. कोविडवर नियंत्रण करण्यासाठी औषध निर्माण अधिकारी यांना आरोग्य मित्र पुरस्कार द्यावा. अंशकालीन स्त्रीपरिचर यांना वेळेवर मानधन न देणाऱ्या लिपिकावर कारवाई करावी, यासह इतरही मागण्या लवकर निकाली काढल्या नाही तर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करून निषेध नोंदविणार, असा इशारा जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे यांनी दिला.