पुरुषांमध्ये काटोल तर महिलांत यवतमाळ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:14 AM2018-01-02T00:14:05+5:302018-01-02T00:14:32+5:30
नगर परिषद वर्धा व जिल्हा क्रीडा खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला-पुरुष खो-खो स्पर्धेत पुरूषांमध्ये काटोल तर महिलांमध्ये यवतमाळ येथील संघांनी विजय प्राप्त केला.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : नगर परिषद वर्धा व जिल्हा क्रीडा खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला-पुरुष खो-खो स्पर्धेत पुरूषांमध्ये काटोल तर महिलांमध्ये यवतमाळ येथील संघांनी विजय प्राप्त केला. पुरस्कार वितरण रविवारी पार पडले.
अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर तर अतिथी म्हणून संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, सभापती निलेश किटे, मीना भाटीया, बंटी गोसावी, श्रेया देशमुख, सर्व नगरसेवक तथा कर्मचारी उपस्थित होते.
वैयक्तिक पुरस्कारांची लयलूट
पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत महिला विभागात उपान्त्य फेरीमध्ये पराभूत संघ हयुमिनिटी स्पोर्टींग क्लब परतवाडा व विदर्भ क्रीडा मंडळ काटोल यांना पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी वैयक्तिक पुरस्कारानेही खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
महिला विभागात द्वितीय क्रमांकाचा संघ छत्रपती युवक क्रीडा प्रसारक मंडळ नागपूर रोख पुरस्कार तथा संघातील १२ खेळांडूना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. पुरुष विभागात चतुर्थ क्रमांकाचा संघ नवजय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळ, तृतीय क्रमांकाचा संघ तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा आणि द्वितीय स्थानावरील संघ विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल यांना रोख पुरस्कार तथा संघातील १२ खेळाडूंना भेटवस्तू देण्यात आल्या.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला संरक्षक यवतमाळची सुप्रिया घुघरे तथा सर्वोत्कृष्ट पुरूष संरक्षक विदर्भ क्रीडा मंडळ काटोलचा शुभम जांभळे, दिलराज सेंगर यांना वैयक्तिक प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
महिला विजयी संघ नवजयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ तथा पुरूष विजयी संघ विदर्भ क्रीडा मंडळ काटोल यांना रोख पुरस्कार व १२ खेळाडूंना भेटवस्तू देण्यात आल्या. अरुण पट्टेवार, किरण मारतोडे यांच्या स्मृतीत स्पर्धेदरम्यान अष्टपैलू महिला व पुरष खेळाडूंना सचिता नासरे, सचिन पट्टेवार यांना प्रोत्साहनपर रोख पुरस्कार देण्यात आले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाला रमेश बुटे, विनोद हांडे, गणेश उईके, सुनील चुन्ने, अविनाश सेलुकर, राजू देशमुख, श्याम भेंडे, संजय इंगळे, सुनील मोहड, दिनकर काकडे, सतीश काकडे, राजेश मारतोडे, प्रकाश मारतोडे, डॉ. यशवंत हिवंज, कैलास बाकरे तसेच विदर्भाच्या विविध भागातून या स्पर्धेत पुरूष व महिला खेळाडू उपस्थित होते. पालिकेच्या पुढाकाराने आयोजन झाले.
मान्यवर व खेळाडूंचा सत्कार
खो-खो क्रीडा प्रेमींतर्फे नगराध्यक्ष तराळे यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय खो-खो व हॅन्डबॉल खेळाचे खेळाडू प्रशिक्षक नंदिनी बोंगाडे, हॅन्डबॉल प्रशिक्षक मार्गदर्शक सुरेश बोंगाडे, कबड्डीपटु व आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता विदर्भातील एकमेव पंच प्रतिनिधी रामराव किटे, कबड्डीचे प्रशिक्षक किशोर पोफळी, आंतरराष्ट्रीय अॅथलेटीक्समधील तांत्रिक अधिकारी, अॅफ्रो. एशियन मैदानी स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून कार्य केलेले तसेच महाराष्ट्र अॅथलेटीक्स असो.तर्फे २०१७ चा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त रमेश बुटे, माजी खो-खो खेळाडू सुनील तिनघसे तथा १९९४ हॉलीबॉलसाठी छत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली रहाणे यांच्याद्वारे त्यांच्या मातोश्रींनाही सन्मानित केले गेले.