पारा ९.०१ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:23 PM2017-12-27T23:23:28+5:302017-12-27T23:23:39+5:30
नोव्हेंबर महिन्यात जाणवणारी थंडी एकाएकी लोप पावली होती. यामुळे यंदा हिवाळा अनुभवायला मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. यातच बुधवारी किमान तापमानाने यंदा निच्चांक गाठला व जिल्हा गारठायला लागला.
श्रेया केने।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नोव्हेंबर महिन्यात जाणवणारी थंडी एकाएकी लोप पावली होती. यामुळे यंदा हिवाळा अनुभवायला मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. यातच बुधवारी किमान तापमानाने यंदा निच्चांक गाठला व जिल्हा गारठायला लागला. उत्तर भारतात बर्फवृष्टीला प्रारंभ होताच विदर्भ प्रांतात थंडीला सुरूवात होईल, असा अंदाज हवामान खात्याच्या वैज्ञानिकांनी वर्तविला आहे.
बुधवारी सकाळी वर्धेत ९.०१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी रात्रीचे तापमान १२.०१ अंश होते. मागील ३ ते ४ दिवसांपासून तापमानात घट होत असल्याचे नोंदीवरून दिसून येते. यापूर्वी जिल्ह्यात हिवाळ्यामध्ये किमान तापमान ५.८ अंशांपर्यंत नोंदविले गेले आहे. यंदा सर्वात कमी तापमान बुधवारी सकाळी नोंदविण्यात आले. दिवाळीनंतर थंडी सुरू होत असे; पण काही वर्षांपासून थंडीला नोव्हेंबर अखेर सुरूवात होत आहे. थंडीचा कडाका सुरू होताच शहरातील वर्दळही रात्रीनंतर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी आलेल्या ओखी वादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे अडत होते. परिणामी, विदर्भ प्रांतातील थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरल्याचे दिसून येत होते. आता वातावरणातील हा अडथळा दूर झाल्याने थंडी कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. शिवाय पारा यापेक्षाही खाली जाण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत.
उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट
उत्तर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे एकाएकी तापमानात २ ते ३ अंशांनी घट झाली आहे. मंगळवारी किमान तापमान १२.२ अंश सेल्सीयस होते. बुधवारी सकाळी हाच पारा ३ अंशांनी खाली उतरला. आजचे सकाळचे किमान तापमान ९.०१ अंश सेल्सीयस नोंदविले, अशी माहिती हवामानाचे अभ्यासक नितीन डोंगरे यांनी दिली.
शेतीसाठी पोषक
शेतीकरिता सध्याची थंडी पोषक आहे. विशेषत: रबी हंमागातील गहू आणि चणा पिकांना हा गारठा उपयुक्त आहे. यामुळे सध्या सुरू झालेल्या थंडीच्या कडाक्याचा परिणाम शेतीवर होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.