पारा 46 अंशावर; शासकीय कर्मचारी कुलरच्या हवेसाठी भर दुपारी घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 05:00 AM2022-05-18T05:00:00+5:302022-05-18T05:00:19+5:30
पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. अशातच विविध कार्यालयांतील कर्मचारी भर दुपारी कार्यालयात राहतात की कुलरची हवा घेण्यासाठी घरी जातात याचा रिॲलिटी चेक मंगळवारी केला असता निम्म्याहून अधिक कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याच रिकाम्या असल्याचे बघावयास मिळाले. विचारणा केल्यावर दौऱ्यासह जेवणाचे कारण पुढे करण्यात आल्याने अधिकारी खुर्चीत तोवरच कर्मचारी कार्यालयीन वेळेच कार्यालयात थांबतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
राजेश सोळंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा (आर्वी) : मागील काही दिवसांपासून सूर्य आगच ओकू पाहत असून पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. अशातच विविध कार्यालयांतील कर्मचारी भर दुपारी कार्यालयात राहतात की कुलरची हवा घेण्यासाठी घरी जातात याचा रिॲलिटी चेक मंगळवारी केला असता निम्म्याहून अधिक कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याच रिकाम्या असल्याचे बघावयास मिळाले. विचारणा केल्यावर दौऱ्यासह जेवणाचे कारण पुढे करण्यात आल्याने अधिकारी खुर्चीत तोवरच कर्मचारी कार्यालयीन वेळेच कार्यालयात थांबतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पूर्वीच पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. अशातच दुपारच्या सुमारास कर्मचारीच कार्यालयात राहत नसल्याने विविध कामांनिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालय प्रमुख कार्यालयात नसल्याच्या संधीचे सोने कामचुकार करीत असल्याचे दिसून आले.
कायमस्वरूपी मुख्याधिकारीच नाही
- मंगळवारी दुपारी २ वाजता आर्वी येथील नगरपालिका कार्यालयात रिॲलिटी चेक केला असता येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने कर्मचारीही मनमर्जीचा अवलंब करीत असल्याचे दिसून आले.
- पालिकेतील १२ प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक वर्धा व एक नागपूर येथे सेवा अधिग्रहित करण्यात आल्याने आणि दोन अधिकारी सुट्टीवर होते. १७ लिपिकांपैकी दोन सुट्टीवर तर १६ शिपायांपैकी ३ सुट्टीवर होते. ८५ आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांपैकी आठ रजेवर होते. दुपारी २ वाजता जेवणासाठी चार कर्मचारी थेट घरी गेल्याचे दिसून आले.
वर्धा येथील मनोजकुमार शहा यांच्याकडे सध्या सीओंचा प्रभार आहे. महिला कर्मचारी कार्यालयातच डबा आणून जेवण करतात. तर काही कर्मचारी भोजन अवकाशात घरी जात जेवण करतात. ते वेळीच परतही येतात. करतात.
- रणजित पवार, उपमुख्यधिकारी, न.प. आर्वी.
सलगच्या सुटीचा घेतला काहींनी आनंद
- दुपारी अडीच वाजता आर्वी पंचायत समिती कार्यालयातील सातही विभागांची पाहणी केली असता काही महिला व पुरुष कर्मचारी त्यांच्या टेबलावर जेवण करीत असल्याचे निदर्शनास आले.
- तर प्रभारी गटविकास अधिकारी यांच्या केबिनमध्ये बैठक सुरू होती. त्यामुळे विविध कामांनिमित्त आलेले नागरिक गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर प्रतीक्षा करीत होते. या कार्यालयात पंचायत विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार आहे. नऊ पर्यवेक्षक परिचरपैकी तिघे रजेवर असल्याचे सांगण्यात आले.
पंचायत समिती कार्यालयांतर्गत एकूण ५९ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. ९० टक्के कर्मचारी डब्बा आणून भोजन अवकाशात कार्यालयात जेवण करतात. तर ज्यांचे घर जवळ आहे ते घरी जात वेळीच कार्यालयात परत येतात.
- डी. आर. घारड, सहा. प्रशासकीय अधिकारी, पं. स. आर्वी.
महावितरणचे कर्मचारी दक्षच
- दुपारी ३ वाजता महावितरण कार्यालय गाठून पाहणी केली असता काही कर्मचारी जेवण करीत होते. तर कार्यकारी अभियंता यांच्या दालनात बैठक सुरू होती.
- या कार्यालयात कार्यकारी अभियंतासह आठ अधिकारी आहेत. एक व्यवस्थापक व पाच लिपिक तसेच लेखा विभागात पाच लेखा लिपिक व दोन शिपाई असून कुणीच रजेवर नसल्याचे सांगण्यात आले.
- सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांची थकबाकीने अडचण वाढविली असून थकबाकी वसुलीनंतरचा थकवाच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर बघावयास मिळाला.
महावितरण या कार्यालयांतर्गत २० अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, खरांगणा असे पाच सब डिव्हिजन आहे. या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी आपले घरून डबा आणत असून भोजन अवकाशात त्याचा आस्वाद घेतात.
- जी. एन. गायकी, मुख्य लिपिक, महावितरण, आर्वी.