पारा ४६ पार; संत्राबागा सरपणाच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 08:30 PM2019-05-30T20:30:10+5:302019-05-30T20:30:51+5:30
तालुक्यातील अनेक शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेतात. परंतु सध्या पारा ४६ अंशाच्या वर गेल्याने त्याचे विपरीत परिणाम झाडांवर दिसून येत आहेत. उष्णतामानामुळे अनेक झाडे सरपण होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
विजय चौधरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यातील अनेक शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेतात. परंतु सध्या पारा ४६ अंशाच्या वर गेल्याने त्याचे विपरीत परिणाम झाडांवर दिसून येत आहेत. उष्णतामानामुळे अनेक झाडे सरपण होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु, मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाला नाही. अशातच शेतकºयांनी जीवाचा आटापीटा करून संत्रा बागा वाचविल्या. मात्र, सध्या शेतातील अनेक विहिरी कोरड्या झाल्याने आणि पाराही ४६ पार गेल्याने संत्र्याची झाडे करपण्यास सुरूवात झाली आहे.
काही शेतकरी टँकरद्वारे पाणी आणून संत्रा बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे; पण सध्या टँकरही सहज उपलब्ध होत नसल्याचे शेतकरी सांगतात. येत्या काही दिवसात मान्सून वर्ध्यात दाखल होत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी मान्सून लांबल्यास तालुक्यातील संत्राच्या संपूर्ण बागा नष्ट होण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही तातडीने योग्य पाऊल उचलण्याची मागणी होत आहे.
बागेत १२०० संत्र्याची झाडे आहेत; पण सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा सध्या सोयाव्या लागत आहे. प्रखर उन्हामुळे संत्रा झाडे करपत आहेत. अशातच शेतातील विहिरीनेही तळ गाठल्याने शेतातील संत्रा झाडे कशी जगवावी, हा प्रश्न सध्या भेडसावत आहे.
- हनुमंत पठाडे, माजी सरपंच, सेलगाव (ल.).
कारंजा तालुक्यात १९०० हेक्टर जमीन ही संत्रा पिकाखाली आहे. अतिउष्णतेमुळे व पाण्याअभावी संत्रा बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, शासनाकडून कुठलेही आदेश अजूनपर्यंत आलेले नाहीत.
- विजय मंहत, तालुका कृषी अधिकारी, कारंजा (घा.).