रोजगार पात्रतेच्या गुणवत्तेने यश संपादन करता येते
By admin | Published: May 20, 2017 02:20 AM2017-05-20T02:20:59+5:302017-05-20T02:20:59+5:30
शिक्षण घेत असतानाच कॅम्पस इंटरव्हूच्या माध्यमातून नामांकित कंपन्यात रोजगाराची संधी उपलब्ध होणे
सुबोध देशमुख : बा.दे.मध्ये कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षण घेत असतानाच कॅम्पस इंटरव्हूच्या माध्यमातून नामांकित कंपन्यात रोजगाराची संधी उपलब्ध होणे ही उज्वल भविष्याची वाट समजली जाते. कॅम्पस इंटरव्हू ला समोरे जातांना विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या तयारी केली पाहिजे. आत्मविश्वास ही यशाची पायरी समजली जाते. दृढ आत्मविश्वास बाळगा आणि निर्भयपणे मुलाखतीला समोरे जावे. रोजगार पात्रतेच्या गुणवत्तेने यश संपादन करता येते, असे प्रतिपादन सुबोध देशमुख यांनी केले.
बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात ट्रेनींग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्यावतीने ‘सॉफ्ट स्किल’ या विषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर ट्रेनींग अॅण्ड प्लेसमेंट अधिकारी विजय काळबांडे उपस्थित होते.
देशमुख पुढे म्हणाले, राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्याना तांत्रिक कुशल मनुष्यबळाची सतत गरज असते. फक्त रोजगाराची पात्रता आपल्या अंगी असावी लागते. लेखी परीक्षा समूह चर्चा, वैयक्तिक मुलाखत अशा कॅम्पस इंटरव्हूतील यशाच्या पायऱ्या आहेत. यासाठी ज्ञान अपडेट ठेवत तयारीने व आत्मविश्वासाने समोरे गेल पाहिजे असे त्यांनी सांगितले.
नामांकित कंपन्यात रोजगाराची संधी ही मिळतेच; पण रोजगारपात्रतेची गुणवत्ता आपल्यात असली तर यश सहजरित्या संपादन करता येत असल्याचेही ते म्हणाले. प्रा.काळबांडे यांनी कॅम्पस इंटरव्हू मध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी नामाकिंत कंपन्याची निवड करण्याची पद्धत, निकष विविध चाचण्या याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यशाळेला द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.