विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा, मारण्यासाठी उगारले धारदार शस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 12:55 PM2023-07-08T12:55:30+5:302023-07-08T12:57:12+5:30
यशवंत विद्यालय समोरील प्रकार : पोलिसांनी घेतली धाव घेत वाद सोडविला
सेलू (वर्धा) : शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. यादरम्यान दोन गटामध्ये तुफान राडा होऊन एकाने चक्क धारदार शस्त्र उगारले. यात एका दहावीतील युवकाला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना यशवंत विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
स्थानिक यशवंत विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर नेहमीच टवाळखोरांचा वावर असतो. यशवंत विद्यालय, महाविद्यालय तसेच आयटीआय कॉलेज याच रस्त्यावर असल्याने शाळा, कॉलेज सुटण्याच्या वेळेवर येथे विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. यशवंत शाळेच्या समोरच बसचा थांबा आणि ऑटो स्टॅण्ड असल्याने येथील गर्दीत आणखीच भर पडते. आज शुक्रवारी पाच वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर झालेल्या गर्दीमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा झाला. यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या विद्यार्थ्यांनी दहावीतील एका विद्यार्थ्यास जबर मारहाण केली. यावेळी एकाने धारदार शस्त्र उगारल्याने चांगलीच धावपळ उडाली.
यादरम्यान उपस्थितांनी सोडविण्याचा प्रयत्न करुन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही लागलीच घटनास्थळी धाव घेत हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्यांना पोलिसांच्या पद्धतीने समज देण्यात आली. शाळकरी विद्यार्थ्यांनी हाणामारीसाठी चक्क धारदार शस्त्राचा वापर केल्याने मुलेही कोणत्या स्तराला जात आहे, याचा अनुभव उपस्थितांना आला. यासोबतच त्यांच्याकडे घटनास्थळी शस्त्र उपलब्ध असल्याने हा राडा पूर्वनियोजित तर नव्हता ना? अशीही शंका व्यक्त होत आहे. या वादाचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. या घटनेवरून विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.