मोबाईलवर संदेश येऊनही तुरी घरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:02 AM2018-05-21T00:02:11+5:302018-05-21T00:02:11+5:30
नाफेडची शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली. यात कागदपत्रे देऊनही बहुतांश शेतकरी आॅनलाईन नोंदीपासून वंचित राहिले. त्यांचा उद्रेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर दिसून आला; पण काही शेतकऱ्यांना तर मोबाईलवर संदेश येऊनही नाफेडला तूर विकता आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : नाफेडची शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली. यात कागदपत्रे देऊनही बहुतांश शेतकरी आॅनलाईन नोंदीपासून वंचित राहिले. त्यांचा उद्रेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर दिसून आला; पण काही शेतकऱ्यांना तर मोबाईलवर संदेश येऊनही नाफेडला तूर विकता आली नाही. आता त्यांनी कुणाकडे तूर द्यावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यादीत नावे असलेल्या, तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर नाफेडने खरेदी केली; पण कोळोणा (घोडेगाव) येथील तिखे नामक शेतकºयाने दोन महिन्यांपूर्वी पेरापत्रक, आधार कार्ड, बँक पासबुक नोंदणीसाठी दिले. दोन्ही भावंडांची तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी झाली. तत्सम संदेशही त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले; पण जेव्हा ते शेतकरी तूर विक्रीसाठी नाफेडच्या पुलगाव केंद्रावर गेले तेव्हा तूर घेण्यास नकार देण्यात आला. त्यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाºयाला विचारणा केली असता यादीत नाव नसल्याने तूर घेता येत नसल्याचे सांगण्यात आले. यांनी मोबाईलमधील नोंदणी क्रमांक व संदेश दाखविला; पण त्याला कर्मचाºयांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी, शेतकºयाला तूर घरीच ठेवावी लागली. आधुनिक तंत्रज्ञान युगात आधुनिकीकरणाचा फटकाच या शेतकºयांना बसल्याचे दिसून येत आहे. मोबाईलवर संदेश आहे; पण यादीत नाव नसल्याने या शेतकºयांना तूर खरेदीपासून वंचित राहावे लागले.
खरेदी बंदमुळे शेतकरी चिंतित
तुरीच्या भावामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. नाफेडच्या तूर खरेदीच्या दरात व बाजारपेठेतील दरात मोठी तफावत आहे. पैसे नंतर मिळतील; पण भाव चांगला मिळेल, या आशेत शेतकरी तूर विक्रीसाठी नाफेड केंद्रावर आणत होते; पण नाफेडची खरेदी बंद झाल्याने आता पूढे काय, हा प्रश्न अनेक शेतकºयांना भेडसावत आहे.
२६ एप्रिल रोजी डाटा मिसींगबाबत सर्व केंद्रांना सूचना दिल्या होत्या. तसेच मिसींग डाटा रिकव्हर करुन देवू, असे सांगितले होते; पण केंद्रांनी डाटा पाठविला नाही.
- रिंगण चांदेकर, प्रतिनिधी, नाफेड.