दुचाकी रॅलीतून ‘हेल्मेट’ वापराचा दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:41 PM2018-11-24T23:41:20+5:302018-11-24T23:42:15+5:30
मागील काही महिन्यांपासून हेल्मेट वापराबाबतची वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेची विशेष मोहीम थंडबस्त्यात पडली होती. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर गरजेचा असून १८ नोव्हेंबरला त्याबाबत लोकमतने ‘हेल्मेट वापर मोहीम गारठली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही महिन्यांपासून हेल्मेट वापराबाबतची वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेची विशेष मोहीम थंडबस्त्यात पडली होती. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर गरजेचा असून १८ नोव्हेंबरला त्याबाबत लोकमतने ‘हेल्मेट वापर मोहीम गारठली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून पोलीस प्रशासनाने सदर मोहीम पुन्हा नव्या जोमाने राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालय येथून जनजागृतीपर दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून हेल्मेट वापराचा संदेश देण्यात आला.
हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीची सुरूवात पोलीस अधीक्षक कार्यालय येथून झाली. या रॅलीने बजाज चौक, शास्त्री चौक, बॅचलर रोड, आरती चौक, धुनिवाले मठ चौक, आर्वी नाका, शिवाजी चौक, बजाज चौक, बस स्थानक असे मार्गक्रमण केले. रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालयात झाला. या जनजागृतीपर दुचाकी रॅलीत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आॅरेंज सिटी रायडर क्लब नागपूरचे पदाधिकारी तसेच सदस्य, एनसीसीचे छात्र सैनिक, दक्ष फाऊंडेशन पोलीस मित्र, डोमिनोझ, पीएनजी आणि सन्स ज्वेलर्स, न्य आर्टस् अॅन्ड कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला रा.पो.नि. शालिक उईके, वाचक शाखेचे स.पो. नि. दहिभाते, कल्याण शाखेचे स. पो. नि. मोहंडुळे, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे स. पो. नि. जितेंद्र चहांदे, स. पो. नि. कोडापे, पो.उ.नि.पवार, गुजरकर आदींची उपस्थिती होती.